
होते दूर दूर किती/साऱ्या स्वप्नांचे शहर…
आता विसावले माझ्या/पापणीच्या काठावर- डॉ.क्षमा गोवर्धने-शेलार
नाशिकच्या कन्येचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान
नाशिक:- साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि संस्कृती मंत्रालयाच्या मध्य-दक्षिण सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणातील राष्ट्रपती निलयम, राष्ट्रपती भवन, हैदराबाद येथे 'भारतीय कला महोत्सव' नुकताच संपन्न झाला. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
२२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या प्रदेशांच्या लोकसंस्कृती आणि साहित्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘नारी चेतना’ या शीर्षकाखाली साहित्य अकादमीच्या काव्यसत्रात निमंत्रित कवयित्रींचे सादरीकरण झाले. २६ नोव्हेंबर रोजी आयोजित या सत्रात महाराष्ट्रातून लेखिका व कवयित्री डॉ. सौ. क्षमा गोवर्धने शेलार यांना साहित्य अकादमीकडून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासह मंगळूरस्थित येथील कोकणी कवयित्री स्मिता शेनॉय आणि गुजराती कवयित्री रक्षा शुक्ला या निमंत्रित कवयित्री होत्या.
डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार यांनी स्त्रीजीवनातील विविध टप्प्यांना स्पर्श करणाऱ्या मराठी कविता तसेच त्यांचे सामर्थ्यपूर्ण हिंदी अनुवाद सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी त्यांना साहित्य अकादमीचे श्री. पाटील सर, श्री. राजशेखर सर तसेच राष्ट्रपती निलयमच्या व्यवस्थापिका सौ. रजनीप्रिया मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांचे व मित्रमंडळींचे मार्गदर्शन आणि पाठबळ मोलाचे असल्याचे डॉ. क्षमा शेलार यांनी नमूद केले.
डॉ.क्षमा या ज्येष्ठ कवी विलास गोवर्धने (कवी आकाश) आणि नाशिक जिल्हा परिषद आणि कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालिका प्रतिभा गोवर्धने यांचे सुपुत्री आहेत.
