
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे समाज घडत असतो. छत्रपती शिवराय आणि डॉ.आंबेडकर अशा विविध क्षेत्रातील महापुरुषांच्या विचारांनी आपण घडलो. निखिल सातपुते यांनी वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदत करत अनोखी समाजसेवा केली आहे. अशी संवेदनशीलता जपणे हाच खरा वाढदिवस!, असे गौरवोदगार स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी काढले.
स्वराज्य पक्षाच्या नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष निखिल सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर पळसे येथील ग्रामाभिमान मंचाचे अध्यक्ष प्रमोद गायधनी, उद्योजक सुनील आगळे, ऋषी आंबेकर, वैभव झाडे, अभिजीत तुपे, चंद्रभान ताजनपुरे, देवीदास भावसार यांच्यासह मुख्याध्यापक अरुण पगार उपस्थित होते.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात निखिल सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या, रायटिंग पॅड, स्कूलबॅग, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रमोद गायधनी आणि चंद्रभान ताजनपुरे यांनीही आपल्या भाषणात वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल निखिल सातपुते यांचे अभिनंदन आणि अभीष्टचिंतन केले. वाढदिवसानिमित्त फळांचा केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांनीही एका सुरात निखिल सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक अरुण पगार आणि सर्व शिक्षक कर्मचारीवृंदाने पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.
