नाशिक:( प्रतिनिधी)- कविता हा भावभावनांचा आविष्कार असतो. बालपणाला वळसा घालून सरकत जाणाऱ्या सर्वांच्या आयुष्यात अंतरीचे शब्दच मनातलं गुपित सांगतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ.आशा कुलकर्णी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २०५वे पुष्प गुंफताना त्या 'शब्द माझ्या अंतरीचे' या पुस्तकावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक सोमनाथ साखरे होते.
प्रा.डॉ.कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, जेव्हा शब्द साथ देतात; तेव्हा साहित्याचा प्रवास सुरू होतो. मनातील शब्द हळूहळू कागदावर उमटत जातात. आयुष्याची पावलं टाकत असताना शब्दही पेरले जातात आणि त्यातून खऱ्या अर्थाने साहित्याचा उगम होतो. आयुष्याच्या वाटचालीत अनेक शब्द सापडले आणि अंतरीच्या हृदयात शब्दसाठा संपन्न होत गेला. त्यातूनच काव्यसंग्रह आकाराला आला, असे सांगून त्यांनी प्रतीक्षा, प्रवास, आयुष्याचे गणित, कृतार्थ, मनातल्या मनात, शब्द माझा दिलासा, एक मागणे, नाती, कागदी नाव या कविता सादर केल्या.
पदमाकर देशपांडे आणि पांडुरंग चव्हाण यांना ग्रंथभेट देण्यात आली. ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (५) ख्यातनाम साहित्यिक राजा ठाकूर 'शिल्लक कविता' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.