
शब्द, संस्कार आणि समाजभान यांचा सुंदर मेळ घालत चांदवडमध्ये कार्यरत असलेल्या चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळातर्फे यंदाचे मानाचे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंडळाने ‘चांदवडी रुपय्या लक्षवेधी पुरस्कार’ नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार, तबलावादक व सांस्कृतिक अभ्यासक श्री. फणिंद्र रंगनाथ मंडलिक यांना, तर ‘चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार’ मालेगाव येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे यांना जाहीर केला आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता, कला, लोकसंस्कृती आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांत समन्वयी काम करणाऱ्या फणिंद्र मंडलिक यांची यंदाच्या ‘चांदवडी रुपय्या लक्षवेधी पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक येथे वास्तव्यास असलेले मंडलिक हे व्यवसायाने पत्रकार असून, मराठी पत्रकारितेबरोबरच भाषेचे भान, संगीताची साधना (तबला विशारद), नाटक–चित्रपट माध्यमातील तांत्रिक व सर्जनशील कौशल्य यांचा दुर्मिळ संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.
फणींद्र मंडलिक यांच्या कारकिर्दीत इलेक्ट्रॉनिक मीडियापासून (स्टार माझा, आयबीएन लोकमत, स्टार न्यूज इ.) ते मुद्रित माध्यमापर्यंत (महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रिन्सिपल करस्पॉन्डंट) असा व्यापक प्रवास आहे. त्यांनी केलेले संवेदनशील वार्तांकन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सखोल कव्हरेज, वारकऱ्यांच्या वारीचा जवळून अभ्यास, लोकनाट्य–लोककलेला दिलेले संगीत आणि संघटित मंच, तसेच नाशिकच्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात पार पाडलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचा गौरव या पुरस्कार घोषणेतून करण्यात आला आहे. मंडलिक यांना यापूर्वी नेटवर्क १८चा ‘वॉव अवॉर्ड’ (सलाम महाराष्ट्र, ग्रेट भेट कार्यक्रमासाठी), ‘स्टार ऑफ द इयर’ सन्मान, महाराष्ट्र टाइम्सचा मटा सन्मान (रिपोर्टाज कार्यक्रमासाठी), महाराष्ट्र टाइम्सचे दोन वेळा टॅलेंट अवॉर्ड, राज्य शासनाचा स्व. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, सांस्कृतिक कार्य संचलनालयासह अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे सर्व पुरस्कार, साहित्य–कला–संस्कृती आणि जिज्ञासू पत्रकारितेद्वारे समाजमनाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कामाची नोंद असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.
या सन्मानपर ‘चांदवडी रुपय्या लक्षवेधी पुरस्काराचे स्वरूप महावस्र, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असे असेल. फणिंद्र मंडलिक यांना पाठवलेल्या पत्रामधून त्यांच्या बहुआयामी कार्याला ‘चांदवडी रुपय्या’चा सलाम नोंदवण्यात आला आहे.
मालेगावसारख्या सामाजिक–धार्मिक, आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या पटावर साहित्य, शिक्षण आणि सामाजिक बदलाचे अक्षरदीप पेटवणारे साहित्यिक आणि कार्यकर्ते श्री. राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे यांना ‘चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
राजेंद्र दिघे हे ‘आई प्रतिष्ठान, मालेगाव’ व ‘शाब्बास गुरुजी फाउंडेशन’ या संस्थांचे संस्थापक असून, शिक्षण, बालसाक्षरता, बालविकास, वाचनसंस्कृती आणि संस्कृती संवर्धन या क्षेत्रांत सातत्याने काम करीत आहेत. ‘शाब्बास गुरुजी’ या त्यांच्या पुस्तकातून गुरु–शिष्य परंपरा, शिक्षकांचे समाज घडवणारे योगदान आणि प्रेरणादायी शैक्षणिक मूल्ये सहज, हृदयगम्य भाषेत उभी राहिली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन उच्चस्तरीय व्यासपीठावर झाले असून, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरक ठरणारे हे लेखन व्यापक चर्चेत राहिले आहे.
साहित्यिक म्हणून त्यांनी काव्यसंग्रह, बालसाहित्य, सामाजिक विषयांवरील लेख आणि ‘काळजातील लामणदिवा’सारख्या लेखमाला यांद्वारे मराठी वाचकांसमोर जिवंत, प्रबोधनात्मक आणि संवेदनशील जग उभे केले आहे. त्यांच्या लिखाणात स्त्रीस्वातंत्र्य, सामाजिक न्याय, पर्यावरण, ग्रामीण वास्तव, अहिराणी बोलीचा सन्मान असे अनेक पदर आढळतात. साप्ताहिक–मासिक माध्यमांतून, तसेच सामाजिक माध्यमांवरून ते सतत लेखन आणि संवाद करत असून, नव्या पिढीला मातृभाषेतून विचार करण्यास प्रवृत्त करणारे कार्य ते करीत आहेत.
राजेंद्र दिघे यांच्या कार्यकर्ता भूमिकेतून राबवलेले बालशिक्षण–साक्षरता उपक्रम, संस्कृती व लोककलेसाठीचे कार्यक्रम, मालेगाव मराठा सेवा संघ व इतर संस्थांतून झालेले आयोजन, स्थानिक बोली आणि संस्कृतीचे जतन–प्रसार या सर्व कामांची दखल घेऊन मंडळाने त्यांना ‘चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार’ घोषित केला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ११००/- रुपये, महावस्र, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असे आहे.
दोन्ही पुरस्कारांची निवड चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ आणि राजेंद्र उगले, प्रतिभा खैरनार, विजय निरभवणे, भागवत मांदळे, संदीप गुजराथी, रवींद्र केदा देवरे, सविता दिवटे, वाल्मिक सोनवणे या विशेष निवड समितीने एकमताने केली आहे. निवड व आयोजन प्रक्रियेत रावसाहेब खंडेराव जाधव (अध्यक्ष), सागर जाधव जोपुळकर (सचिव), रवींद्र केदा देवरे (उपाध्यक्ष), डॉ. राजेंद्र मलोसे, शांताराम हांडगे, वाल्मिक सोनवणे, सविता दिवटे, सविता दरेकर, हर्षल गांगुर्डे, अजित जाधव, प्रफुल्ल सोनवणे, सुशीला संकलेचा, बाळा पाडवी, जनार्दन देवरे आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाचे ठिकाण, दिनांक व वेळ विजेत्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असून, दोन्ही मान्यवरांनी कुटुंब सहित उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारावा, असे आवाहन चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या घोषणेमुळे नाशिक आणि मालेगाव परिसरातील साहित्य–सांस्कृतिक विश्वात समाधानाचा व अभिमानाचा सूर उमटला असून, चांदवडमधून निघणाऱ्या या ‘रुपय्या’च्या खणखणीत नादाने पुन्हा एकदा साहित्य, कला आणि सामाजिक संवेदनशीलतेचा जागर घातल्याची भावना व्यक्त होत आहे.
योग्य आणि सार्थ निवड केल्याबद्दल दोन्हीही मान्यवरांचे आणि संयोजक यांचे नाशिकच्या कविकुळाकडून हार्दिक अभिनंदन…!!!
