
मालेगाव (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकार रविराज सोनार यांना वाई येथील कवी सरकार इंगळी पब्लिकेशन व विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाई (जि. सातारा) येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या रमेश गरवारे सभागृहात दि. ७ जून रोजी होणाऱ्या ५ व्या मिरग साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
श्री. सोनार हे लेखक, कवी, समीक्षक, संपादक म्हणून परिचित असून गेली ३४ वर्षे पुर्णवेळ पत्रकारिता करीत आहेत. ‘कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’तून होणारा जनसंवाद’ या विषयावर त्यांनी संशोधन केले असून त्यांचा शोध प्रबंध हा अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. ‘मोक्षिणीधारा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासह अनेक पुस्तके त्यांनी संपादित केले आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिली असून पाठराखण (ब्लर्ब लेखन) केले आहे. साहित्य, संस्कृती, इतिहास, हे त्यांचे आवडीचे विषय असून ते माध्यम तज्ज्ञ आहेत. तसेच त्यांचे यासंदर्भात अनेक व्याख्याने झाली आहेत. नाशिक जिल्ह्यासजह पुणे येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत ते सक्रिय आहेत.
शब्दगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मालेगाव मराठी साहित्य संघ माजी अध्यक्ष, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल,(पुणे) अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल माजी कार्याध्यक्ष व जिल्हा संघटक यांसह प. बा. काकाणी नगर वाचनालय सहकार्यवाह, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड कार्याध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह, प्रगतीशील लेखक संघाचे उपाध्यक्ष, सृष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे जनसंपर्क संचालक आदी पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.
यापूर्वी श्री सोनार यांना वैष्णव मित्र पुरस्कार, लोकमान्य गौरव पुरस्कार, जनमित्र पुरस्कार, नेहरू युवा गौरव पुरस्कार, कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर पुरस्कार, साहित्य साधना यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
