
मुंबई 🙁 प्रतिनिधी )लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला आता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे.
या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘ शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार – लोककला क्षेत्र’ या नावाने ओळखले जाईल.
लोककलेला योग्य प्रतिष्ठा
राज्यातील लोककला परंपरेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करते. या पुरस्काराला मान्यवर व्यक्तिमत्वाचे नाव देण्याचा प्रस्ताव काही काळ विचाराधीन होता. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या वामनदादा कर्डक यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. लवकरच या नव्या नावाने सुधारित पुरस्कार जाहीर केला जाणार आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे कार्य…!
महाराष्ट्रातील लोककलेचा ठसा उमटवणारे, सामाजिक बदलाचे प्रवर्तक आणि दलित साहित्य चळवळीचे सांस्कृतिक व्यासंगी म्हणून वामनदादा कर्डक (१५ ऑगस्ट १९१४–१५ में २००४) यांचे नाव विशेष मानाने घेतले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची लोकाभिमुख मांडणी त्यांनी जनमानसात पोहोचवली.
सशक्त शब्दांकन, धारदार आशय आणि लोकभाषेतील ओघवती शैली ही वामनदादांच्या काव्य शैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या गीतांनी आणि पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहावर कायमस्वरूपी छाप पाडलेली आहे…!
