
नाशिक:-महाराष्ट्रात विचारांचा झंजावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला. त्यामुळेच सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देण्याची ताकद बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे, असे प्रतिपादन अविनाश आहेर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात २०३वे पुष्प गुंफताना अविनाश आहेर ‘वास्तव शिवसेना व शिवसेनाप्रमुख’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेंद्र देसले होते.
अविनाश आहेर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. बाळासाहेबांच्या नेतृत्वाला आजपर्यंत कुणीही आव्हान दिले नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे परखड विचार आणि त्यांचे नेतृत्व सर्वश्रुत आहे. जनतेचे मनापासून समाधान होईल, यासाठी त्यांनी काम केले. बाळासाहेबांचा विचार आणि शब्द हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी एक आधार होता. मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून धरणे, आंदोलन, मोर्चा, उपोषण, संप असे अनेक उपक्रम राबवून शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन बाळासाहेब ठाकरेंनी एक विचार या महाराष्ट्राला दिला. शिवसेनेसारख्या विस्तारलेल्या संघटनेकरता त्यांनी केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून शिवसेनेला पाहिले नाही तर जनमाणसांमध्ये शिवसेना अनेक माणसांच्या घरात मनात घर करून राहिली. त्यामुळे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायक आहेत, असेही ते म्हणाले.
बाळासाहेब पगारे आणि संजय सानप यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. आभार गं.पां.माने यांनी मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (२) रोजी प्रा.डॉ.आशा कुलकर्णी ‘शब्द माझ्या अंतरीचे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
