
खडांगळीचा नरभक्षक बिबट्या जेरबंद केला
सिन्नर (वसंत गोसावी प्रतिनिधी) :खडांगळी व परिसरात भीतीचे सावट निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. गेल्या आठ दिवसांत सलग चार हल्ले करून दोन वर्षांच्या गोलू युवराज शिंगाडे या बालकाचा बळी घेणारा आणि महिलांवर धुमाकूळ घालणारा हा बिबट्या आज (सोमवार) मिठसागरे शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सलग हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले होते. रविवारी (ता. 14) वैशाली प्रभाकर गीते या महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर . ग्रामस्थ रोष व्यक्त करत होते गावकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत असतानाच दुसरीकडे वनविभागाने मोठ्या शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते.वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक, तसेच संगमनेर व इगतपुरी येथील विशेष 60 सदस्यीय पथक, ड्रोन कॅमेरे आणि वेब कॅमेऱ्यांच्या साहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आज सकाळी मिठसागरे शिवारात उभारलेल्या पिंजऱ्यात हा नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला.बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरताच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिलांनी जल्लोष केला. “गेल्या आठ दिवसांत जीव मुठीत धरून जगावे लागले, पण आता खरी दिलासा मिळाला,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. खडांगळी, निमगाव देवपूर व आसपासच्या शेतकरी वस्त्यांवरील मृत्यूचे सावट अखेर दूर झाले आहे.वनविभागाने जेरबंद झालेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
