
नाशिक. (प्रतिनिधी):- नाशिक येथील साखर उद्योगातील तांत्रिक सल्लागार, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) चे संचालक, मिल आणि बॉयलर विषयाचे तज्ज्ञ वाळू रघुनाथ आहेर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) चे वार्षिक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. येत्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिऑट हॉटेलमध्ये संस्थेची ७०वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो होणार आहे. यावेळी साखर क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांसह वाळू आहेर यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे. श्री.आहेर यांनी भारतीय साखर उद्योगात चाळीस वर्षे सेवा आणि संशोधन करून देशविदेशातील विविध संस्थांमध्ये योगदान दिले आहे. श्री.आहेर हे कोसाका, संजीवनी, प्रवरा या कारखान्यात सेवा देत होते. देशपातळीवर नवी दिल्ली येथील एसटीएम प्रोजेक्ट लि. आणि एसटीएआय या संस्थांमध्येही त्यांनी उत्तम कार्य केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, एनएसआय कानपूर, सिस्टा, डीएसटीए, एसएनएसआय, बेळगाव याठिकाणी त्यांनी दिलेली शून्य टक्के मिल बंद, तास आणि हाय प्रेशर बॉयलर वापर आणि देखभाल, दुरुस्ती या विषयावरील व्याख्याने आजही लोकप्रिय आहेत. केनिया आणि इंडोनेशियात सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्यासारख्या एका कर्तव्यनिष्ठ आणि हुशार तांत्रिक सल्लागाराचा गौरव होत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगातील हितचिंतक, विविध संस्था, अधिकारीवर्ग, सहकारी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
