
सिन्नर (प्रतिनिधी) इंडो तिबेटियन मंगल मैत्री संघ नाशिक, इंडो तिबेटियन वेल्फेअर असोसिएशन नाशिक तसेच धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती नाशिक यांसारख्या सामाजिक व धम्मकार्य क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने अग्रेसर असलेल्या धम्म प्रचारक धम्म सेविका व धम्म भगिनी ताशी डोलमा दिदी यांचे दिनांक 12 जून 2025 रोजी अल्पशा आजाराने मुनगूट कर्नाटक येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या कार्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी महाबोधी बुद्ध विहार समिती हिवरे यांच्यातर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी हिवरे ता. सिन्नर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास इंडो तिबेटियन मंगल मैत्री संघ

नाशिकच्या अध्यक्षा झोंबादीदी व इतर अनेक तिबेटियन धम्म बांधव, हिवरे पंचक्रोशीतील नागरिक तसेच सिन्नर तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीचे बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महामित्र दत्ता वायचळे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी बौद्धाचार्य कैलास रुपवते यांच्याद्वारे सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी केले. यामध्ये त्यांनी डोलमा दीदींच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सोबतच्या धम्म चळवळीतील घटनांना उजाळा दिला. त्यांनी दलाई लामांच्या निकटवर्तीय म्हणून तिबेट व भारतात केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. याप्रसंगी अहिरे सर व विजू नाना गायकवाड यांनी डोलमा दीदी यांच्या नाशिक मधील वास्तव्यात त्यांनी तिबेटियन बांधवांच्या समस्या सोडवण्यात व सोबतच सामाजिक चळवळीतील केलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.हिवरेकरांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतांना विकास रूपवते यांनी डोलमा दीदी यांच्यामुळे महाबोधी बुद्ध विहारास प्राप्त झालेल्या भव्य धातूच्या बुद्ध मूर्तीबद्दल घटनाक्रम विशद केला. सोबतच हिवरे गावाशी असलेल्या डोलमा दीदींच्या ऋणानुबंधांची आठवण करून दिली. डोलमा दीदींच्या प्रेरणेमुळे जुन्या चावडीचे रूपांतर नवीन रूपातील बुद्ध विहारात झाले. विहारासमोर भव्य सामाजिक सभागृह उभे राहिले. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल वाढून धम्मकार्यास गती मिळाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डोलमा दीदींनी थायलंडहून बुद्ध मूर्ती आणून विधीवत हिवरे येथे दान केली होती. अशाच पद्धतीचे दातृत्व त्यांनी अनेक गावांमध्ये केलेले आहे. त्यांच्या आठवणीने हिवरेकरांना गहिवरून आले होते.डोलमा दीदी यांचे निकटवर्ती उमेश पठारे सर यांनी दीदींच्या आठवणी विशद करतांना त्यांचे दलाईलामांसोबतचे कार्य, त्यांचा परिवार, सामाजिक संपर्क व भावी योजना याबाबत सांगितले. बुद्धिस्ट मॉनेस्टरीज मधील दीदींचे कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.याप्रसंगी सामाजिक चळवळीतील अग्रणी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांचे कार्य उपस्थितांसमोर विशद केले. बुद्धतत्त्वज्ञान व विचारांचा प्रसार करण्यात दीदींचे योगदान त्यांनी सविस्तर सांगितले. उपस्थित धम्म बांधवांना त्यांनी आवाहन केले की वर्षातून एक दिवस दीदींना अभिवादनाचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. तसेच साहित्यिकांनी डोलमादीदींचे कार्य लेख, कविता व इतर साहित्यातून समाजासमोर आणावे.तिबेटियन बांधवांच्या वतीने इंडो तिबेटियन मंगल मैत्री संघ नाशिकच्या अध्यक्षा झोंबादीदी यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. त्यांनी याप्रसंगी धम्म बांधवांचे ऋणनिर्देशही व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद रुपवते यांनी केले. सोबतच त्यांनी डोलमादीदींच्या कार्यावर कवितेचे सादरीकरणही केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन रूपवते (कल्याण) व महाबोधी बुद्ध विहार समिती हिवरे यांचे विशेष सहकार्य लाभले.याप्रसंगी तेलोरे सर, विनायक बिन्नर, सुधाकर रूपवते, बबन रूपवते (कल्याण), अशोक रुपवते, रमेश रुपवते, डॉ. रवींद्र रुपवते, जयवंत रुपवते, दिनकर रूपवते, डॉ. डी. व्ही. रुपवते, दिलीप रुपवते, रमेश रुपवते यांच्यासह हिवरे येथील महाबोधी बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी, धम्मबांधव व धम्मभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अखेरीस डोलमादीदी यांना सामूहिक श्रद्धांजली व्यक्त करून उपस्थितांना भोजनदान करण्यात आले. तसेच डोलमादीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले.
