
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात दिलेल्या निर्णयानुसार होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेला आता अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांमध्ये टीईटी परीक्षा द्यावी का? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. तसेच ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीस पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी शाळांतील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षक पात्रता परीक्षा निर्णयाने शिक्षक जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
निर्णयाचे प्रमुख मुद्दे :
1.सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.ज्यांना सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला आहे, त्यांना तात्पुरती सूट.
3.अल्पसंख्यांक संस्थांमधील शिक्षकांसाठी TET लागू होणार का, याबाबतचा निर्णय स्वतंत्र खंडपीठ घेणार.
पिढ्यानपिढ्या ज्ञान देणारे, समाजाला दिशा दाखवणारे हेच गुरुजन आज टिईटीच्या भीतीने ग्रासले आहेत. “परीक्षेचं प्रमाणपत्र” हेच आता त्यांच्या गुणवत्तेचं मोजमाप ठरणार आहे. वर्गात शिकवतानाही शिक्षकांना “हे टिईटी मध्ये विचारलं जाईल की काय ?” अशी कुचंबणा होऊ लागली आहे.
शिक्षकांच्या सामाजिक आयुष्यावरही टिईटीची छाप दिसण्याची शक्यता आहे.
लग्नसमारंभ असो, नातेवाईकांच्या गाठीभेटी असोत. आता प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना एकच प्रश्न विचारला जावू शकतो :
“TET पास झाला का?”
“किती मार्क मिळाले?”
यामुळे TET चा निकाल हा शिक्षकांच्या आयुष्याचे नवे सामाजिक ओळखपत्र बनण्याची शक्यता आहे.
अनेक शिक्षकांसाठी ही परीक्षा ऑलिम्पिक सारखी प्रतिष्ठेची ठरणार आहे.अतिरिक्त अभ्यास, जादा क्लासेस, मॉक टेस्ट्स हे चक्र सुरू होणार असून त्यातून पहिला “TET विजेता” होण्यासाठी झगडणारे शिक्षक ही एक नवीच शर्यत लढताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
टिईटी निकाल लागल्यानंतर मात्र “आपण आता पात्र शिक्षक ठरलो” हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकणार आहे. पण वस्तुस्थिती अशी की, ते आधीपासूनच ज्ञानदानासाठी पात्र होते, फक्त एका कागदाच्या तुकड्याची वाट पाहत होते असे म्हणावे लागेल.
अखेर शिक्षक वर्गात आता एकच प्रश्न विचारला जातोय “आम्ही शिकवतोय की शिकतोय?”
ज्ञानाचे पुजारी असलेले शिक्षक आता एका परीक्षेचे नर्व्हस विद्यार्थी झाले आहेत, हीच आजची खरी शोकांतिका आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांना पात्रता चाचणी घेऊन शासनाने सेवेत घेत असते. मग ही फेरपरीक्षा फक्त आम्हालाच का ? ही सापत्नभावाची वागणूक केवळ शिक्षकांना का प्रश्न सर्वांना सतावतो आहे. शिक्षक संघटनांमध्ये देखील न्यायालयाच्या या निर्णयामुळे चलबिचल झाली असून आपली भूमिका ठरवणे त्यांनाही जिकीरीचे ठरू लागले आहे असे दिसते.
हा निर्णय शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवणार की शिक्षकांना आणखी ताणाखाली ढकलणार , हे येणारा काळच ठरवणार आहे!
