
अष्टगंध प्रकाशन प्रकाशित ‘आई कधीच नसते मरत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे. समवेत डावीकडून कवी रवींद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले, संजय शिंदे, मनीषा उगले, राजेंद्र उगले, विजयकुमार मिठे, प्रकाश होळकर, ह.भ.प.बापूराव महाराज उगले, प्राचार्य लक्ष्मण महाडिक.
नाशिक:- प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो पण प्रत्येक मुलासाठी त्याची आई एक सुंदर कविता असते आणि ती कविता तो मुलगा आयुष्यभर काळजात जपत असतो. सगळी नाती नश्वर असतीलही पण आई हे एकच नातं असं आहे जे चिरंतन आहे आणि ते आपल्या पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत कायम टवटवीत असतं. कारण कितीही ठरवलं तरी ‘आई कधीच नसते मरत’! कवी राजेंद्र उगले यांनी याच शीर्षकाचा आईची महती वर्णन करणारा आणि संस्कारदीप प्रकाशित करणारा काव्यसंग्रह लिहून एकप्रकारे आईचं महन्मंगल स्तोत्रच वाचकांच्या स्वाधीन केलं आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ समीक्षक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कवी कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी काढले. ते सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात अभिनेते व कवी राजेंद्र उगले यांच्या ‘आई कधीच नसते मरत..!’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलत होते. डॉ. धोंडगे पुढे म्हणाले की, थीम कविता लिहिणे हे तसे अवघड काम असते. कारण यामुळे लिखाणात तोच तोपणा येण्याची शक्यता असते. राऊ यांनी हा धोका पत्करूनही संग्रहावरील पकड ढिली होऊ दिली नाही. यामागे आईचे आशीर्वाद आहेत. अनेक कवींनी आजवर आई या विषयावर कविता लिहिल्या आणि संग्रहित रुपात त्या छापल्याही पण आईच्या एकत्रित आणि एकाच कवीने लिहिलेल्या कवितांचा हा संग्रह विरळा आहे. साने गुरुजींनी गद्य स्वरूपात श्यामची आई लिहिली पण राजेंद्र उगले यांनी मात्र काव्यातून हे दिव्य पेललं आहे हे कौतुकास्पद आहे. कार्यक्रमात संग्रहावर भाष्य करताना कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांनी कवितांचे संदर्भ आणि शब्दकळा उलगडून दाखवताना यातील काही ओळी या भविष्यात सुभाषिते म्हणून वापरली जातील असा आशावाद व्यक्त केला. गीतकार प्रकाश होळकर यांनी आई कधीच नसते मरत या संग्रहाचे रूपाने प्रत्येकाला आपली आई आठवत राहील हे सांगतानाच अनेक कवींच्या कवितांशी या संग्रहातील कविता पडताळून पाहत संग्रहातील नवीन प्रतिमा आणि प्रतिकांचं कौतुक करत हा संग्रह कवीला नक्की नाव मिळवून देईल असे प्रतिपादन केले. कवी विवेक उगलमुगले यांनीही साने गुरुजी आणि मॅक्झिम गॉर्की यांची आई ग्रेट होतीच पण सर्वसामान्य कुटुंबात आपण जन्मलो असलो तरी आपलीही आई कधीच कमी नसते आणि ती सतत आपल्याला लढण्याचं बळ देत असते असं हा संग्रह वाचताना प्रत्येक वाचकाला येईल याची खात्री दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी राजेंद्र उगले यांचा साहित्यिक प्रवास उलगडून दाखवला. नव्या लिहित्या हातांनी दुसऱ्याचा हात धरून या साहित्यप्रवासाला सुरुवात केली असली तरी स्वतःचा रस्ता त्यांना वेळेत निवडता यायला हवा आणि तो रस्ता त्यांना प्रशस्त करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणून कवी राजेंद्र उगले या साहित्यिकाकडे पाहिले जाईल याची खात्री असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत कु. प्रेरणा राजेंद्र उगले हिच्या प्रार्थनेने झाली. अष्टगंध प्रकाशनाचे प्रकाशक कवी संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कवी प्रशांत केंदळे, अरुण इंगळे, संजय गोरडे, दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी संग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. आभार कवी मुकुंद ताकाटे यांनी तर सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कवी राजेंद्र उगले यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली
