
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी 🙂 मनेगाव (ता. सिन्नर) येथील आमदार मळा भागातील उपक्रमशील अंगणवाडी सेविका सुरेखा बाळासाहेब गायकवाड (वय 45) यांचा शुक्रवारी (ता.12) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. बालकांचे संगोपन, मातांच्या आरोग्याची काळजी आणि समाजहिताचे कार्य अशा जबाबदाऱ्यांतून वाटचाल करणाऱ्या सेविकेचा जीवनप्रवास क्षणात थांबल्याने गावासह संपूर्ण अंगणवाडी परिवाराला मोठा धक्का बसला आहे.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरेखा आपल्या मुलगा सुशांत आणि नातू मित यांच्यासोबत स्कुटीवरून मनेगावकडे जात होत्या. देवनदी पुलाजवळील रौनक लॉन्स परिसरात रस्त्याच्या खड्ड्यामुळे स्कुटी घसरली. मुलगा व नातू रस्त्याच्या कडेला फेकले गेले; परंतु दुर्दैवाने सुरेखा रस्त्यावर कोसळल्या असताना मागून आलेल्या आयशर वाहनाचा त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेपूर्वी दिवसभर त्यांनी अंगणवाडीतील बालकांना शिक्षण दिले, गरोदर माता व बालकांच्या लसीकरण मोहिमेत भाग घेतला आणि दुपारी नातवाला दवाखान्यातून घेऊन आल्या होत्या. जबाबदाऱ्यांचा दिवस संपवून घरी परतताना मात्र मृत्यूने अचानक गाठल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. या अपघातात मुलगा सुशांत किरकोळ जखमी झाला तर दीड वर्षांचा नातू मित सहीसलामत बचावला.त्यांच्या निधनाने मनेगावसह संपूर्ण तालुक्यातील अंगणवाडी सेविका-कर्मचारी वर्गात दुःखाचे वातावरण आहे. पती बाळासाहेब गायकवाड, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे व सासू असा परिवार त्यांच्या पश्चात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशिरा मनेगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मच्छिंद्र खरात यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.“नेहमी सिन्नरला येताना चारचाकी वाहनात येणाऱ्या सुरेखाताईंनी कुटुंबाचा आग्रह न मानता आजच दुर्दैवाने मोटारसायकलने जाण्याचा आग्रह धरला. ‘मरण आले ठायी तर चालून जाई पायी’ या उक्तीचा अनुभव त्यांच्या निधनाने सत्य ठरला,” अशी ग्रामस्थांची भावना आहे.—सलग तिसरी शोकांतिका!गेल्या दीड वर्षांत सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ठाणगाव भलेवाडी येथील मदतनीस मिना भरत भले आणि पाथरे धुमाळ मळा येथील मदतनीस राधिका तुषार निरगुडे या रस्ते अपघातात गाडीच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडल्या होत्या. आता सुरेखा गायकवाड यांच्या निधनाने ही शोकांतिका अधिक तीव्र झाली आहे.“रस्त्यावरील खड्डे आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे अंगणवाडी सेविका सलग मृत्युमुखी पडत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी सर्वत्र चर्चा आहे.—प्रतिक्रियासौ. अनिता गोसावी, अंगणवाडी सेविका :“मानधन तत्वावर काम करणारे अंगणवाडी कर्मचारी आजही अपघात विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळत नाही. या गंभीर बाबीकडे विविध अंगणवाडी संघटना आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.”
