
बातमी नांदगाव (वार्ताहार )”महिला सबलीकरण ” काळाची गरज ओळखून व्ही. जे . हायस्कूल नांदगाव येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी NCC विभागाचे वतीने “महिला सबलीकरण आणि नई रोशनी स्कीम “या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका तसेच अडव्होकेट विद्याताई कसबे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे आणि क्रीडा शिक्षिका श्रीमती.सुनीता देवरे मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व माननीय मुख्याध्यापक यांच्या स्वागताने झाली. विद्याताईंनी एन.सी.सी. च्या मुलींना मार्गदर्शन करताना महिलांचे शिक्षण, स्वावलंबन आणि समान हक्क यांचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की शिक्षण, आत्मविश्वास आणि कर्तृत्व हेच खरे महिलांच्या सबलीकरणाचे शस्त्र आहे आणि त्यांनी त्यांचे काही अनुभव विद्यार्थिनींना सांगितले . त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित गर्ल्स कॅडेट यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. यानंतर NCC विद्यार्थिनी यांनी महिला सबलीकरण या विषयावर आधारित समूह नृत्य व प्रभावी पथनाट्य सादर केले. एन.सी.सी. च्या प्रथम आणि द्वितीय वर्षीय गर्ल्स कॅडेट्सने सादर केलेले नृत्य आणि पथनाट्य प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेले.या प्रसंगी पोस्टर मेकिंग स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कॅडेट वैष्णवी जगताप हिने सुंदर आणि आकर्षक पोस्टर तयार करून प्रथम क्रमांक पटकाविला. तिला मा . मुख्याध्यापक आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले .

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदर, जागरूकता आणि सबलीकरणाची जाणीव अधिक दृढ झाली आणि या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक , इतर सर्व मा. पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
