
वसंत गोसावी: सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ वाढत असून ग्रामीण जनतेचे आयुष्य भयभीत झाले आहे. खडांगळी गावातील शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या निमगाव देवपूर शिवारातील लामकानी शेतात शनिवारी दुपारी भीषण घटना घडली.
शेतात शेतीकामासाठी आलेली कोकणी मजूर मंडळी चाळीत बसलेली असताना अचानक बिबट्याने धाड टाकत त्यांच्यातील दीड वर्षाचा बालक गोलू युवराज शिंगाडे याला उचलून नेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने शेतात ओरडाआरडी उडाली.
ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. जवळपासच्या उसाच्या शेतात 200 मीटर अंतरावर गोलूचा मृतदेह आढळून आला. गोलू हा मूळचा कुंबाळे (ता. पेठ) येथील रहिवासी असून आई-वडिलांसोबत मजुरीसाठी निमगाव-खडांगळी शिवारात आला होता. निष्पाप बालकाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
सात दिवसांत तीन मुलांवर हल्ला – दोघांचा मृत्यू
या घटनेमुळे सिन्नर तालुका हादरला आहे. गेल्या सात दिवसांत या भागात बिबट्याने तीन मुलांवर हल्ला केला आहे. पंचाळे येथे सारंग गणेश थोरात (वय ५) या बालकाचा मृत्यू झाला, तर आज गोलू शिंगाडे याने प्राण गमावला. याआधी शिव संपत बोस हा बालक ग्रामस्थांच्या धाडसामुळे थोडक्यात बचावला होता.
या सर्व घटना डांबरनाला परिसराच्या तीन किलोमीटर परिघात घडल्या असून लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“हा बिबट्या नरभक्षक बनला आहे” – ग्रामस्थांचा आरोप
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सतत लहान मुलांवरच हल्ला होत असल्याने हा बिबट्या नरभक्षक झाला आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त झाला नाही तर कोणत्याही कुटुंबावर कधीही काळ ओढवू शकतो.
“आम्ही शेती करायची कशी? दिवसा-रात्री मुलं घराबाहेर काढायची कशी? अशा अवस्थेत आयुष्य असह्य होत आहे” अशी भीती व्यक्त केली जात आहे.
संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
सलग घडणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी घेऊन उद्या रविवार, दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता ओझर विमानतळ – शिर्डी विमानतळ राज्यमार्ग (क्र. 35) वर खडांगळी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
खडांगळी, निमगाव (देवपूर), पंचाळे परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनावर दबाव वाढणार
लोकांना भयमुक्त आयुष्य मिळावे, मुलांचे जीव सुरक्षित राहावेत याकरता हा बिबट्या कायमचा हटवावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
