सिन्नर ( वसंत गोसावी सिन्नर प्रतिनिधी):”शिक्षक हेच राष्ट्राचे खरे शिल्पकार” या वचनाला साजेसा इतिहास पांगरी (ता. सिन्नर) येथील पांगारकर परिवाराने रचला आहे. एकाच दिवशी, एकाच कुटुंबातील चार जणांना वेगवेगळ्या नामांकित संस्थांकडून सन २०२५ चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यात अभिमानाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.— पुरस्काराने गौरवले गेलेले शिक्षक :

शिवाजी त्र्यंबक पांगारकर – मुख्याध्यापक, जनता विद्यालय शिवडेआदिवासी विकास फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.शैक्षणिक दृष्टीकोन, शाळेच्या प्रगतीसाठी झटणारे प्रयत्न आणि आदिवासी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठीचे कार्य या कारणास्तव त्यांचा सन्मान.

दत्तात्रय त्र्यंबक पांगारकर – उपशिक्षक, वाजे विद्यालय सिन्नरसिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व आर.एम. ड्रीप स्प्रिंकलर कंपनीचा आदर्श शिक्षक पुरस्कार.विद्यार्थ्यांशी सुसंवाद, अध्यापनातील प्रयोगशीलता आणि समाजकार्यातील कार्यशीलता यामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

अशोक त्र्यंबक पांगारकर – उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेगावलायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार.आधुनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक प्रक्रियेत वापर करून विद्यार्थ्यांसाठी “तंत्रस्नेही शिक्षक” ठरले आहेत.

श्रीमती स्वाती येवले-पांगारकर – उपशिक्षिका, पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगावरोटरी क्लब ऑफ सिन्नरचा आदर्श शिक्षिका पुरस्कार.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत शाळेत उपक्रमशीलतेचे वारे आणल्याबद्दल त्यांचा गौरव.— शेतकरी आई-वडिलांची पार्श्वभूमी :या यशामागे एक भावनिक आणि प्रेरणादायी कथा दडलेली आहे.पांगारकर बंधूंचे वडील श्री त्र्यंबक विठोबा पांगारकर आणि आई सौ. मीराबाई त्र्यंबक पांगारकर हे दोघेही स्वतः अशिक्षित. दिवसरात्र शेतीच्या कष्टांवर कुटुंब चालविताना त्यांनी एकच संकल्प केला – “माझी मुलं शिकली पाहिजेत, शिक्षक झाली पाहिजेत.”आई-वडिलांच्या त्यागातून व साध्या ग्रामीण संस्कारातून तिन्ही मुलं आणि सुनेने शिक्षकी पेशा स्विकारला. आज त्यांच्या त्यागाला व मेहनतीला फळ मिळाले असून, एकाच वेळी चौघांनाही पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रूंची ओल दाटून आली असून दुसरीकडे समाधानाचे हसू उमटले आहेत.“आमी शिकू शकलो नाही, पण आमच्या लेकरांनी शिक्षक म्हणून तालुक्यात नाव कमावलं. आज आम्हाला वाटतं, आयुष्यभराच्या कष्टाला खरं समाधान मिळालं.” – असे भावनिक शब्द वडील त्र्यंबक पांगारकर यांनी उच्चारले.तर आई मिराबाई पांगारकर म्हणाल्या – “शेताच्या मातीतून उगवलेली ही चार फुले आज संपूर्ण गावाला सुगंध देत आहेत. यापेक्षा मोठा आनंद कोणता?”— गावाचा अभिमान :पांगारकर परिवाराच्या या दुर्मिळ आणि प्रेरणादायी कामगिरीमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरी गाव उजळून निघाले आहे.गावकुसापासून जिल्ह्यापर्यंत या परिवाराची चर्चा होत असून, “ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही” या उक्तीला खरी जाणीव या परिवाराने निर्माण केली आहे.पांगारकर परिवार म्हणजे शिक्षण क्षेत्रातील उज्ज्वल दीपस्तंभ व पालकांच्या त्यागाचे जिवंत उदाहरण आहे अशी परिसरात चर्चा आहे. विविध संस्था पदाधिकारी यांनी या परिवाराचे अभिनंदन केले आहे.
