
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी): न्यू इंग्लिश स्कूल, पंचाळे येथे नुकतेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व अवयव दान जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी व प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय, दोडी येथील आरोग्य तज्ञ समुपदेशक डॉ. विकास बोडके व प्रा. शा. वैद्यकीय अधिकारी श्री. राजकुमार आणेराव यांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक विलास पवार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली व शिस्तबद्ध दिनचर्येचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर डॉ. बोडके यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि एड्स प्रतिबंध यावर मार्गदर्शन केले.

त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत आरोग्यविषयक माहिती आत्मसात केली.याप्रसंगी अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित करताना श्री. आणेराव व डॉ. बोडके यांनी सांगितले की, “अवयव दान म्हणजे इतरांना नवजीवन देण्याची पवित्र संधी आहे. कायदेशीर प्रक्रिया, सामाजिक फायद्यांबाबत योग्य माहिती असणे अत्यावश्यक आहे.”विद्यार्थ्यांसाठी विशेष क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याची व अवयव दानास सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची शपथ घेतली.शेवटी आभारप्रदर्शन गुरुळे सर यांनी केले. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सेक्रेटरी राजेश गडाख यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य-जागृती व समाजहिताची भावना दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला.या कार्यक्रमाला व्यासपीठावर राजेंद्र गडाख, नवनाथ थोरात, प्रवीण शेलार, सूर्यचंद्र खुळे, भाऊ पाटील गुरुळे, बाळू शिंदे, विजय शिलावट, दीपक गंगावणे, माधुरी निकम, तेजल गीते, तेजल ठोक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. अशा जनजागृतीमूलक कार्यक्रमांमुळे “सुदृढ विद्यार्थी – सुदृढ समाज” ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
