
*नाशिक | (प्रतिनिधी )–”मी प्रथम भारतीय नागरिक असून भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य रुजवणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे” असा संदेश देत सरोज जगताप जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना)यांनी रोपाला पाणी घालत भारत ज्ञान विज्ञान समुदायाच्या द्वैवार्षिक जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन उत्साहात केले. मॉम्स् कोकण कट्टा, जत्रा – नांदूररोड, नाशिक येथे आयोजित या अधिवेशनास जिल्ह्यातील 100 हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.उद्घाटन सत्रात प्रमुख उपस्थिती अशोकराव गायधनी, राज्याध्यक्ष, भा.ज्ञा.वि.स., प्रा.अजय दरेकर, राज्य खजिनदार, भा.ज्ञा.वि.स., लक्ष्मण जाधव, राज्य सहसचिव, भा.ज्ञा.वि.स., जिल्हाअतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांची होती.

राज्याध्यक्ष गायधनी यांनी संघटनेच्या कार्याची पार्श्वभूमी मांडली व कार्यकर्त्यांमध्ये संयम, संवेदनशीलता व निरीक्षणाची भावना कशी विकसित करावी, याबाबत मार्गदर्शन केले. प्रा.दरेकर यांनी शिक्षण अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन केले. डॉ. नेहते यांनी आरोग्य अधिकारासाठी शासन आणि समाज यांनी एकत्र येऊन काम करायला हवे अशी मांडणी केली. अधिवेशना च्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष भा.ज्ञा.वि.स. डाॅ.प्रदीप जायभावे हे होते. त्यांनी उद्घाटन सत्राचा समारोप केला. अधिवेशन प्रसंगी विष्णुपंत गायखे ,राहुल गवारे, डॉ.ओंकार गवळी, बेबी पवार व शाम विसपुते हे उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली व आगामी कामाची दिशा ठरविण्यात आली.अध्यक्ष – करुणा जाधव.सचिव – नीता कोष्टी.उपाध्यक्ष – डॉ. सुविधा खाडे, नारायण जाधव.खजिनदार – तुषार गावित.सहसचिव – रोहिणी मिठे, गोपी कांबळे.सदस्य – रघुनाथ हळदे, योगिता देवराळे, विजया बंदरे, डॉ. समीर अहिरे, डॉ. प्रदीप जायभावे, जयराम सोनवणे, विलास गवळे, सुभाष मेंगाळ. या अधिवेशनाच्या माध्यमातून संघटनेने पुढील कार्ययोजना ठरवून जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
