
. लेखक प्रा. मोहन वडतकर.गीताई नगर, वर्धा.दि.11/09/2025*
श्री ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधीचे 2025 हे 729 वे वर्ष. अवघे विश्वचि माझे घर अशी शिकवण समस्त जगाला देणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींनी सर्व जगाला तेराव्या शतकात पसायदान दिलं.पसायदान व विश्वबंधूत्व या दोन्ही संकल्पना जवळपास एक असलेल्या दिसून येतात. माऊली म्हणतात विश्वात्मक देवाची प्रार्थना म्हणजे जगातील प्रत्येक जीवाची प्रार्थना. पसायदानात आदर्श समाजाची मांडणी माऊलींनी केली आहे. ती मांडणी किंवा ते चित्र कुणा आकाशातील देवाने निर्माण करावयाचे नसून, ते आपणच घडवावयाचे आहे, असा अर्थ माउलींना अपेक्षित आहे. माउलींच्या पसायदानाचाअर्थबोद जगातील प्रत्येकाला असणे ही नितांत काळाची गरज आहे. फक्त धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही. माऊली म्हणतात, “जगात जे काही शुभ घडायचे किंवा घडवायचे ते जगातील प्रत्यकाचे कर्तव्य आहे. हा जो माऊलींचा विचार आहे, तो स्वामींच्या विश्वबंधुत्वाच्या विचारांशी, शिकवणुकीशी अगदी मिळताजुळता आहे. भारतातील खासकरून महाराष्ट्रातील जी संत परंपरा आहे, त्यांचेच हे विचार आहेत. संत नामदेव, गोराकुंभार, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई, कान्होपात्रा, संत एकनाथ तसेच संत तुकाराम इत्यादी वारकरी संप्रदायाच्या संतांनी मनावतावादी दृष्ट्रीने भारतामध्ये त्यांच्या काळात बंधुत्व वा भ्रातृभाव समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. मुख्यत्वे संतांच्या कृती -उक्तीतून ही बंधुत्वाची प्रेरणा समाजाला मिळत गेली. वरील संतांच्या अभंगवाणीतून प्रकटणारी बंधुत्वाची भावना ही मुख्यत्वे आध्यात्मिक प्रकारची होती. त्या दृष्टीने प्राचीन संतांचे व भक्तिसंप्रदयाचे वाड्•मय विशेष लक्षणिय आहे. आधुनिक काळात भारतीय समाजसुधारक स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्वे समाजात रुजवण्यासाठीच कार्य करीत होते. महात्मा फुले यांनी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करतांना असे सांगितले की,”प्रत्येक मानसाने श्रम करून भाकर मिळवावी. एकमेकाच्या अधिकाराची बूज राखून ‘भातृभाव’ जपावा एकाच घरातील व्यक्तींनी वेगवेगळ्या धर्माचे पालन केले तरी हरकत नाही.” भारतीय संविधानाच्या सरनाम्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन तत्वाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात व्यक्तीची आत्मप्रतिष्ट्रा जपणारी, देशाचे ऐक्य आणि एकात्मता यास सबळ करणारी स्वामीजींची विश्वबंधुत्वाची भावना वृध्दिगंत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंदानी 11सप्टेंबर 1893रोजी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या मंचावर आपले विचार व्यक्त करतांना, संत ज्ञानेश्वर यांनी तेराव्या शतकात मांडलेले पसायदान मागितलं. स्वामीजींचं हे व्याख्यान म्हणजे मानवी जीवनाला दिलेलं ध्येयाचं व जीवनादर्शाचं देणं आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय दृष्टीने महत्वाचं आहे.स्वामीजींनी आपल्या भाषणाची सुरवात केली, तीच मुळी अमेरिकेतील माझ्या प्रिय भगिनींनो व बंधूंनो या वाक्यानं. आणि सभागृहात दोन मिनिटं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. कारण ते फक्त औपचारिक संबोधन नव्हतं, तर माऊली म्हणतात त्याप्रमाणे ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले | हृदयी हृदय एक झाले ||’असं अंतःकरणातून आलेलं होतं. बंधुत्व फक्त बोलण्यात नसून आचरणात व स्वभावातही असाव, लागतं याची अनुभूती अमेरिकन श्रोत्यांना आली होती.शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील स्वामीजींच्या प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाची माहिती मिळाली होती.स्वामीजींनी जगाला भारताच्या अमर्याद शक्तीचा परिचय करून दिला.यापूर्वी या दिवसाचे महत्व जगाला माहित नव्हते ;कारण आतापर्यंत आपण आपल्याकडील आध्यात्मिक शक्ती कुणासमोरच उघड केली नव्हती. या दिवशी स्वामीजी नेहमीचे भगवे कपडे परिधान करून सभागृहात पोहचले होते. त्यावेळी ‘ जगाला देण्यासाठी भारताकडे पुष्कळ काही आहे,’ असा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता, स्वतःविषयी असा प्रचंड आत्मविश्वास असणे, ही एक असामान्य घटना होती. तेव्हाची परिस्थिती पाहिली, तर सर्वत्र नकारात्मकता होती. आपल्याला स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकारच नव्हता. सगळीकडे विरोधाचे स्वर उमटत होते. अशा परिस्थितीत स्वामीजींनी आपले परखड विचार जगासमोर मांडून सर्व जग जिंकून घेतले होते.जागतिक सर्वधर्म परिषदेला जगभरातील सर्व धर्माचे व पंथाचे प्रतिनिधी आमंत्रीत होते. इ.स. 1492मध्ये कोलंबसने सर्वप्रथम अमेरिकेचा शोध लावला होता. त्यानुसार वर्ष 1892ला बरोबर या घटनेला 400वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्य अमेरिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शिकागो येथे 1893 मध्ये ‘जागतिक सर्वधर्म परिषद’आयोजित करण्यात आली होती. तेथे सर्वधर्मीय विचारांचे आदानप्रदान होणार होते. वरवर पाहिले, तर आयोजकांचा हेतू अतिशय चांगला असल्याचा दिसून येतो; पण तसे नव्हते. त्यांना ‘ अमेरिका आणि युरोप हेच सर्वश्रेष्ठ देश आहेत ‘ व त्यांचा ख्रिश्चन धर्म सर्वश्रेष्ठ आहे,’ असे या परिषदेच्या माध्यमातून सांगायचे होते.स्वामीजी हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेला उपस्थित होते. परिषदेला जाण्यापूर्वी त्यांनी कन्याकुमारी येथील समुद्रातील शिलाखंडावर बसून तीन दिवस ध्यानधारणा केली होती. त्यानंतर त्यांचा अमेरिकेत जाण्याचा विचार निश्चित झाला. या प्रवासासाठी म्हैसूरच्या राजांनी स्वामीजींना आर्थिक मदत केली. ते मुंबई येथून बोटीने अमेरिकेला मार्गस्थ झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले, “विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेसाठी कुणालाही स्वतःताचा धर्म पालटण्याची गरज नाही. आपण ज्या धर्मात राहतो, त्याच धर्माची चौकट कायम ठेवून चांगले काम करू शकतो.” स्वामीजी नेहमी म्हणत होते, ” आम्हाला माणूस घडवणारा धर्म हवा आहे आणि माणसे हवी आहेत. “त्या दृष्टीने 11सप्टेंबर हा दिवस स्वामीजींचा समजला जातो.स्वामीजींनी 11सप्टेंबरच्या आपल्या भाषणात अतिशय कमी वेळात अनेक मुद्ये मांडले. ते म्हणाले, भारतातील संत मंडळीचा प्रतिनिधी म्हणून मी या परिषदेला आलो आहे. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय संत, ऋषिमुनींचा गौरपूर्ण उल्लेख केला. स्वामीजींच्या बोलण्या चालण्यात,’भाष्यकारांते वाट पुसतु |’ही माऊलींच्या बोलण्यातील विनम्रता पदोपदी दिसून येते.स्वामीजींना हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान होता. हा धर्म सार्वजनीन, सनातन आहे. स्वामीजींच्या मते, हिंदू धर्मात उदारता, परमताबद्दल सहिष्णुता व योग्य मतांचा स्वीकार आणि आदर आहे. सर्वधर्म समभाव हा स्वामीजींचा दृष्टिकोन ज्ञानेश्वर माऊली प्रमाणेच ‘जो जे वांछिलतो ते लाहो |’असाच आहे. स्वामीम्हणतात सर्व उपासना, भक्ति, जपतप, पंथ, संप्रदाय एकाच भगवंताकडे जाण्याचे भिन्न मार्ग आहेत.’ संहिष्णुता म्हणजेच हिंदू धर्म.’ त्यामुळेच पारशी, येहुदी अशा अल्पसंख्य लोकांनी भारताचा आधार घेतला.स्वामीजींनी शिकागो परिषदेत जेव्हा भाषण केले, तेव्हा त्यांचे वय तीस वर्ष होते. आज 65% भारताची लोकसंख्या 30 वर्ष वयोगटयाच्या आतील आहे. भारतीय तरुणांनी स्वामिजींच्या कडून जर प्रेरणा घेतली, तर भारत जगात प्रथम क्रमांकावर जाण्यास वेळ लागणार नाही. स्वामीजींनी आपल्या कल्पनेचे रूपांतर ध्येयवादात करून भारतीय युवकांना प्रेरणा दिली. म्हणून प्रत्येक भारतीय युवकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार करण्यात कुचराई करू नये. स्वामींजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी भारतीय युवकांनी देशाच्या समस्येवर उत्तरे शोधून नवनवीन उत्पादने निर्माण करणे आवश्यक आहे. आज भारतातील शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. व्यापारी, दलाल, अधिकारी व सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. आपले असे मत आहे की, विवेकानंदांनी फक्त धर्मावरच लक्ष केंद्रित केले, केवळ सनातन धर्म व आध्यात्म यावरच भाष्य केले, पण हे चुकीचे आहे. कारण स्वामीजींचे विचार सर्वस्पर्शी होते. स्वामी विवेकानंद यांनी ब्रिटिश काळात भारतात कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी डॉ. सेन यांच्या नेतृत्वाखाली ‘ कृषी संशोधन संस्था ‘स्थापन केली होती. त्यांना वाटायचे की, ज्ञान व कौशल्य वेगळे करून देशाचा कृषी आणि औध्योगीक विकास करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यांच्यामते भारतीय कृषी फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे क्षेत्र आहे. “भारतीय युवक हे नोकरी करणारे नकोत, तर रोजगार निर्माण करणारे असले पाहिजेत.” त्यांच्या मते समाजाची प्रगती ही सतत नवीन नाविण्यावर आधारित असते. म्हणून देशाच्या युवा पिढीला सतत काहीतरी नवसंकल्पना देत राहणे हे समाजाचे कर्तव्य आहे. देशातील युवकांनी देशाच्या ज्या समस्या आहेत, त्यावर उत्तरे शोधावीत.व देशाला प्रगत करावे.स्वामीजींनी 1893 ला शिकागो ‘सर्वधर्म परिषदे’ मध्ये जे विचार व्यक्त केले, त्यामध्ये धर्म हा भारताच्या राष्ट्रीय जीवनाचा आधार आहे, प्राणस्वार आहे. असं स्वामीजींचं मत होतं. त्यांच्या भाषणात माऊलींची करुणा,नामदेव महाराजांची दृढभक्ती,संत तुकारामांची तळमळ व परखडता समर्थ रामदासांची धर्म व राष्ट्रभक्ती ओतप्रत भरलेली होती. सर्वच संतांची मनुष्य निर्मितीची ओढ होती. समाज जागरण व परिवर्तनाचा ध्यास होता.त्यांच्या भाषणात प्रचंड सकारात्मकता, चैतन्यदायी शब्द व त्यातून प्रत्ययास येणारा खरखुरा बंधुभाव होता.आज सर्व जग भारताकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहत आहे. कारण आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे. अनेक देशांना असे वाटते की, चीनऐवजी भारत हा संपूर्ण जगाला अन्नधान्य आणि औद्योगिक वस्तू पुरविणारा देश होऊ शकतो. स्वामीजींनी त्याकाळात एक पाऊल पुढे टाकले होते. म्हणून आज 140 कोटी लोकसंख्यने एक पाऊल पुढे टाकले, तर देश 140 पावले पुढे जाईल. स्वामीजींच्या मते, आपण प्रत्येक क्षेत्रात जागतीक पातळीवर अग्रस्थानी असलो पाहिजे. आपले अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण लक्ष असले पाहिजे. स्वामीजींनी विश्वबंधुत्व या दिवशी आपल्या भाषणात संपूर्ण जगात नवचैतन्य, आत्मविश्वास व आत्मभान निर्माण केले. सर्वांनी आपापल्या धर्माचे पालन करून विश्वबंधुत्व जपावं.तसेच देवाजवळ जाण्यासाठी धर्मांतराची गरज नाही, असा समन्वयाचा व विश्व शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला.स्वामीजींचे भाषण आचरणात आणायचे असल्यास भारताने विश्वगुरू होण्यासाठी पावले उचलावीत!1893 साली स्वामी विवेकानंदांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे.अनेक अडथळे पार करून, संकटांना तोंड देऊन स्वामीजी या परिषदेत पोहचले. आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वानं व ओजस्वी वकृत्वाने त्यांनी अमेरिका जिंकली. त्यांच्यामध्ये सर्व जगातील मानवजातिविषयीचं नितांत प्रेम, देशविदेशातील संपूर्ण मानवजातीच्या उत्थानाची मूलभूत तळमळ, आत्मविश्वास, सर्वसमावेशक विचार व वैश्विक शांतीचा त्यांनी दिलेला संदेश आजही संपूर्ण जगाला लक्षात ठेवण्यासारखा आहे.*************************संदर्भ –1. शिकागो व्याख्याने- स्वामी विवेकानंद.अनुवाद-स्वामी शिवतत्वानंद. रामकृष्ण मठ, नागपूर.2. स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश. संकलन-निवेदिता भिडे. 3.पसायदान व विश्वबंधुत्व संकलन-मीनाताई देशपांडे. 4. स्वामी विवेकानंद समग्र चरित्र. लेखक प्रा. एस. एन. धर. 5.विवेक विचार -प्रा.अमोलजी श्रीकृष्ण अहिरे *************************प्रा. मोहन वडतकर.गीताई नगर, वर्धा.दि.11/09/2025*************************
