
नाशिक:-(प्रतिनिधी )ग्रंथालय हे खऱ्या अर्थाने देवालय आहे. एक पुस्तक आपला मित्र बनला पाहिजे. देवालयाबरोबरच पुस्तकेही आपल्या घरात असली पाहिजेत. सुसज्ज ग्रंथालयामुळेच गावाची समृद्धीकडे वाटचाल होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ यांनी केले . मखमलाबादच्या ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी शिक्षक गौरव समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ.रसाळ पुढे म्हणाले की, ज्ञान आणि विज्ञान आपल्याला मातीशी जोडायला शिकवतं. कौशल्य आणि अध्यात्म यामुळे आपण घडतो. पुस्तकं जरी मुकी असली तरी ती माणसाला बोलायला शिकवतात. वाचनाने मनाची आंघोळ होते आणि माणूस ताजातवाना होतो. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देणे म्हणजे खरे शिक्षण होय. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणून आपण करत असलेला शिक्षकांचा गौरव महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. मखमलाबाद परिसरातील नारायणराव मानकर प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका उज्ज्वला देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे संगीत शिक्षक तुकाराम तांबे, आदर्श प्राथमिक शाळेचे माध्यमिक विभाग प्रमुख सुनील कुटे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ शाल, सन्मानपत्र, सन्माचिन्ह आणि ग्रंथभेट देत सन्मानित करण्यात आले. तसेच सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले, सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक गौरव समारंभासाठी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन गायकवाड यांनी पाच हजार, छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अकरा हजार, प्रा.विकास थोरात यांनी पाच हजार रुपयांची देणगी वाचनालयाला सुपूर्द केली. संचालक गोकुळ काकड यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह शंकर पिंगळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक गौरव समारंभाची वाटचाल सांगितली. मखमलाबाद विद्यालयाच्या गीतमंचाने स्वागतगीत सादर केले. अतिथी परिचय वाचनालयाचे उपाध्यक्ष संदीप धात्रक तर सत्कारार्थी परिचय संचालक राकाशेठ माळी, संजय फडोळ, प्रताप काकड यांनी करून दिला. ज्येष्ठ संचालक निवृत्ती महाले, देवराम पवार, सुभाष काकड, सुभाष तिडके, संजय गामणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, ज्ञानेश्वर पिंगळे, हभप रमेशबाबा काकड, मखमलाबाद सोसायटीचे सभापती प्रकाश काकड, उपसभापती विक्रम कडाळे, शरद काकड, हभप आबा मुरकुटे, नरेंद्र मुळाणे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, मुख्याध्यापिका हेमलता ढोली यांसह परिसरातील शाळांमधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल राजेश शिरसाठ, सोनाली पाठक, विनोद भागवत, दशरथ मानकर, चिंतामण उगलमुगले, संजय मानकर आदींनी परिश्रम घेतले.
