
वावी (ता. सिन्नर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!*प्रतिनिधी : नाशिक | दिनांक : ९ सप्टेंबर २०२५अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी विज्ञानाधारित विचारसरणी स्वीकारणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा अंनिस) चे नाशिकचे जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव यांनी केले. नूतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वावी ( ता. सिन्नर ) येथे एन. एस. एस. व गुरुकुल प्रकल्प अंतर्गत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष नियोजन अंनिस, संविधान जागर विभाग, जिल्हाकार्यवाह,अहिल्यानगर चे दीपक शिरसाट यांच्या प्रयत्नातून झाले. नूतन विद्यालय व एडवोकेट रावसाहेब शिंदे ज्युनियर कॉलेज वावी येथे आयोजन करण्यात आले होते .आपल्या व्याख्यानात घोडेराव यांनी अंधश्रद्धेचे विविध प्रकार मांडले. भुताखेताची बाधा काढणे, झाडफुंक करून रोग बरा करणे, ताईत – कवचाच्या नावाखाली सुरक्षिततेची हमी देणे, टोणगे टाकून धनप्राप्ती घडवून आणणे, भविष्यकथन व दैवी शक्तींचा दावा, नारळातून तेल वा ज्वाला बाहेर येणे, अशा प्रकारांनी लोकांची फसवणूक कशी केली जाते हे त्यांनी स्पष्ट केले. “भीती, अज्ञान आणि अंधविश्वास या तीन गोष्टींवर अशा तथाकथित बाबांचा गल्ला भरतो,” असे त्यांनी अधोरेखित केले.व्याख्यानात घोडेराव यांनी अंधश्रद्धेच्या आड लपलेले विज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे दाखवले. हातातून राख निघणे, नारळातून ज्वाला निघणे, काळी बाहुली जाळणे, प्रश्नचिन्ह माॅडेलवर बेस्टचा गुरुत्व मध्य साधणे, कलशात भूतबाधा बंद करणे, कलशातून तीर्थप्रवाह अखंड वाहणे – हे सर्व चमत्कार नसून वैज्ञानिक प्रयोग असल्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष उलगडले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हे प्रात्यक्षिक पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य मखरे एस. पी., उपमुख्याध्यापक संतोष सोनवणे, विजय शिंदे, नागरे सर, शिवाजी सरोदे, गुरुकुलचे सुहास गावित, सुनील तांबेकर, सौ. मथुरे, श्रीमती थोरात, श्रीमती देशमुख, सौ. गेटम, जयश्री काटे तसेच कारभारी वेलजाळी सर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी घोडेराव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की “अंधश्रद्धेला बळी पडू नका, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा आणि विवेकाची ज्योत समाजात प्रज्वलित करा. प्रत्येक तरुणाने अंधश्रद्धा निर्मूलनाची जबाबदारी अंगीकारली पाहिजे.” उपमुख्याध्यापक सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. गुरूकुल प्रमुख गावित सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
