
सर आयझॅक न्यूटनभौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ स्मृतिदिन – २० मार्च १७२७ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म इंग्लंड मधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात झाला. ते एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्यांच्या आजी जवळ राहिले. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमून भागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्याचा वेग मोजावा. त्यांच्या जवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिज मध्ये ट्रिनिटी कॉलेज मध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, “हे तू काय करतोस?” आयझॅक म्हणाले, “मी वार्याचा वेग मोजतो आहे”. या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेज मध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियम मध्ये ही दुर्बीण आहे. न्यूटन यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले. गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले. गणिता मध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ यांच्या बरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली. *न्यूटन यांचे गतिविषयक नियम*- १) पहिला नियम = कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर एक सरळ रेषा किंवा समान गतीत कार्यरत राहते. ह्याला जडत्वाचा नियमही म्हणतात. २) दुसरा नियम = संवेगाचे परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बदलाशी समानुपती असून संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होतो. F=ma. ३) तिसरा नियम = प्रत्येक क्रियेला समान, विरुद्ध व समकालीन प्रतिक्रिया असते. गुरूत्वाकषणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी १७व्या शतकात लावला. पृथ्वी चे गुरूत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तू च्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तू ची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शुन्य होते. मग ती वस्तु आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरूत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते.

