
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- शिक्षणाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. शालेय जीवनात झालेल्या शिकवण आणि संस्कारातून उत्तम माणसाची निर्मिती होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे यांनी केले.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात दहावी शालांत परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 'निरोप आणि आशीर्वाद समारंभा'प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण पगार होते.
श्री.केंदळे पुढे म्हणाले की, जीवनात सकारात्मकता आवश्यक आहे. आपले सादरीकरण व्यवस्थित करा आणि मोठी स्वप्नं पहा. गुणवंत-ज्ञानवंत विद्यार्थ्यांमुळेच शाळेचा गौरव वाढत असतो, असे सांगून त्यांनी-
*'सूर्य जिंकून ये चंद्र जिंकून ये...*
*स्वर्गासाठी तुझ्या इंद्र जिंकून ये'*
या कवितेसह शाळा माझी सुंदर आहे, बाप, माय अमृताचा घडा, सरांचे सांगणे अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. ‘बापलेकीची कहाणी’ या कवितेच्या सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.
पीयूष आडके, ओम जाधव, कृष्णा आडके, श्रावणी गायधनी, मानसी टिळे, कावेरी मुठाळ या विद्यार्थ्यांसह वर्गशिक्षक व्ही.ए,पाटील आणि एस.बी.शिरसाठ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करून पालक आणि शाळेचे नाव उंचवावे, असे आवाहन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
