
नाशिक: ( प्रतिनिधी ) -समाजात ध्येयवादी कार्य करणारी अनेक माणसं असतात. त्यांच्यामुळे समाज सुदृढ बनत असतो. मनातली प्रांजळ तळमळ आणि जाणीव समाजाशी एकरूप होत असते, असे प्रतिपादन युवाकवी माणिकराव गोडसे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १८१वे पुष्प गुंफताना ‘धन्यवाद’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत सावळीराम तिदमे होते. श्री.गोडसे पुढे म्हणाले की, कविता प्रत्येकाच्या जीवनात दिलासा देत असते. विविधांगी साहित्य वाचनातून आणि चिंतनातून माणसाला प्रगल्भ बनवत असते. सामाजिक बांधिलकी असलेल्या साहित्यातून जीवनाला एक आयाम प्राप्त होतो. समाजातील व्यंगावर आणि शोषणावर कोरडे ओढणाऱ्या कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश आहे. नवा समाज, माणसास जाणणारा माणूस, माणुसकी सांभाळणारा असावा; असा आशावादही जागवण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. संग्रहातील विविध कविता त्यांनी सादर केल्या. सुनीता वाळुंज आणि वैजयंती सिन्नरकर यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर अशोक कुमावत यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१२) अशोक सोनवणे ‘काहुर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
