
मालेगाव (वार्ताहर) – सेल्फी काढाणे खूप सोपे आहे मात्र इमेज तयार करणे कठीण आहे. इमेज (प्रतिमा) निरंतर व सातत्यपूर्णपणे केलेल्या निष्काम कार्यातून निर्माण होते. यासाठी शिक्षकांनी सतत कार्यप्रवण राहणे आवश्यक आहे. पुरस्काराने प्रेरणा व प्रोत्साहन मिळते, प्रेरणेतून राष्ट्र निर्माण होते. त्यामुळे पुरस्कारर्थी गुरुजनांनी विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठीत शिक्षणातून साक्षरतेबरोबर राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, बंधुत्वाचे संस्कार रुजविण्याचा ध्यास घेऊन अधिक जबाबदारीने, झोकून देऊन काम करावे असे प्रतिपादन नाशिक विवेकानंद केंद्राचे मा. नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे यांनी केले ते येथील समर्थ प्रतिष्ठान व दैनिक मालेगावचा बालेकिल्ला परिवारातर्फे आयोजीत गुरुजन गौरव सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रमेश उचित होते. दाभाडी येथील श्रीक्षेत्र रोकडोबा मंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मालेगाव रोटरीचे पदाधिकारी प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी शिक्षकांच्या निवड प्रक्रीयेतील विविध निकष सांगून आदर्श शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये सांगितलीत. समाजातील नामवंत व्यक्तीच्या यशात शिक्षकांचे मार्गदर्शन व योगदान त्यांनी विविध उदाहरणे दाखले देऊन विशद केले. रमेश उचित यांनी प्रत्येक पुरस्कारर्थी शिक्षकांचे वेगळेपण व गुणवैशिष्ट्ये स्पष्ट केलीत.

यावेळी किशोर चौधरी, डॉ. अरुण पठाडे, प्राचार्य पी. एन. पवार, राजेश धनवट, संपादक निवृत्ती बागूल, उपसंपादक विवेक बागूल, सतिष अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. समवेत मालेगाव वृत्तपत्र संघटना, जिल्हाभरातून आलेले पुरस्कारर्थी शिक्षक विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्नेहीजन, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हाभरातील २१ गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

पुरस्कारर्थी शिक्षकांच्या वतीने किशोर ठाकरे यांनी मनोगतून कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक संपादक निवृत्ती बागूल यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती भारती पगार यांनी केले तर आभार उपसंपादक विवेक बागूल यांनी मानलेत. समारोपानंतर उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
