
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी) :सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावावर आज रविवार (ता. ७) रोजी संध्याकाळी दुर्दैवाचे काळे ढग दाटून आले. अंगणात निरागस मित्रांसोबत लपाछपीचा खेळ खेळत असलेला दहा वर्षीय सारंग गणेश थोरात याच्यावर अचानक बिबट्याने झडप घालून जीवघेणा हल्ला केला. निष्पाप बालकाचा खेळता खेळता मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेले आहे.ग्रामस्थांच्या आरडाओरडीनंतर हिंस्त्र बिबट्याने सारंगला गंभीर जखमी अवस्थेत सोडून पळ काढला. ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी व पथक धावून आले आणि सारंगला गंभीर जखमी अवस्थेत सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी करून सारंगला मृत घोषित केले. निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी कळताच पंचाळेच नव्हे तर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावून बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजच (रविवारी) सकाळी खडांगळी येथील ठोक वस्ती परिसरातही अशाच प्रकारे एका बालकावर हल्ला झाल्याने सलग दोन घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.(खेळण्याच्या वयात खेळता खेळता आयुष्य गमावणाऱ्या चिमुकल्या सारंगच्या दुर्दैवी जाण्याने पंचाळे गावाचे आकाश काळवंडून गेले आहे. गावभर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू अनावर होत आहेत. गावातील वातावरणात एकच प्रश्न गुंजतोय – “आपल्या लेकरांचे रक्षण कोण करणार?”)
