
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी ):सिन्नर तालुक्यातील खडांगळी शिवार रविवार (ता.7) रोजी सकाळी भीषण आरोळ्यांनी दणाणून गेला. मक्याच्या शेताजवळ खेळणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक झडप घातल्याने गावभर भीतीचं वातावरण पसरलं. आतापर्यंत गाव परिसरात व शेतात बिबट्या अनेकदा दिसला होता, पण मानवी व्यक्तीवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गावकरी अक्षरशः हादरून गेले आहेत. धाडसी कुटुंबीय व शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे चिमुकल्याचा जीव थोडक्यात वाचला.शिव संपत बोस असे या चिमुकल्याचे नाव आहे.सरपंच सौ. कल्पनाताई नवनाथ ठोक यांच्या वस्तीजवळ राहणाऱ्या बोस कुटुंबाचा या प्रसंगाने काळजाचा ठोका चुकवला. सकाळच्या वेळी बोस कुटुंब व परिसरातील शेतकरी शेतमजुरीत व्यस्त असताना लहानगा शिव आपल्या निरागस खेळात रमला होता. पण मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणात झेप घेतली आणि निष्पाप बालकावर नखांचे पंजे रोवले.अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थित शेतकऱ्यांनी एकच आरडाओरड केली. नवनाथ ठोक, एकनाथ ठोक, इतर शेतकरी, शेतमजूर व बोस कुटुंबीयांच्या धाडसाने बिबट्याला मागे हटावं लागलं. काही क्षणांत घडलेल्या या थराराने उपस्थितांचे अंगावर काटा उभा झाला.या हल्ल्यात शिवच्या कपाळावर व पाठीवर नखांचे ओरखडे उमटले असून उपचारासाठी त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी गावकऱ्यांच्या मनात भीतीची छाया अधिक गडद झाली आहे. वनविभागाला घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पिंजरा उभारून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.शेत शिवारात राहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे सावट पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवारात बिबट्याचा मुक्त संचार जाणवत होता. मात्र आज प्रथमच त्याने थेट मानवावर झडप घातल्याने गावकरी चिंतेत पडले आहेत. आपल्या पिकांसोबतच लेकरांच्या जीवाची काळजी प्रत्येक शेतकरी पालकाला सतावू लागली आहे. खडांगळी गावात घडलेल्या या घटनेने केवळ गावच नव्हे तर सिन्नरच्या पुर्व भागातील पंचाळे परिसरात देखील बिबट्या आढळल्याने देवनदी खोरे परिसर हादरून गेला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून गावकऱ्यांचा जीवित सुरक्षेचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील वडनेर येथे चिमुकल्यावर जेवणघेणा हल्ला करून बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा खडांगळी येथे घडलेली ही घटना नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहे.
