
सिन्नर (प्रतिनिधी :वसंत गोसावी)
सिन्नर येथील पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल येथे शिक्षक दिनाच्या औचित्याने तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित आदर्श पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या थोर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक विभागाचे माजी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भूषवले. सिन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे, जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव एस.बी. देशमुख, नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. विजयाताई देशमुख, आर.एम. ड्रिपचे संचालक अथर्व केदार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रदीप सांगळे, तालुका अध्यक्ष एल.डी. बेणके आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला प्रतिष्ठेचे परिमाण लाभले.

एस.बी. देशमुख यांनी पुरस्कार वितरणाच्या मागील संकल्पना स्पष्ट करताना “शिक्षक व मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीसाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांना सन्मानाची थाप मिळावी हीच खरी प्रेरणा” असे गौरवोद्गार काढले.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी “जशी महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी सरस आहे तशीच सिन्नर तालुक्याची शैक्षणिक प्रगतीही उल्लेखनीय आहे” असे आत्मीयतेने सांगितले.
सौ. विजयाताई देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या बहुआयामी योगदानाचे कौतुक केले.

उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांनी प्रशासकीय सहकार्यासोबतच “आठवड्यातील एक दिवस मोबाईलविना जगण्याचा संकल्प करूया” असे प्रेरणादायी आवाहन केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना “शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांचा यशस्वी पाठपुरावा करणाऱ्या सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्य अभिमानास्पद आहे” असे अधोरेखित केले.
या सोळाव्या गुणगौरव सोहळ्यात तालुक्यातील 30 हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कारार्थी
मधुकर देशमुख, लक्ष्मण बेणके, काशिनाथ तळपाडे, एकनाथ भाबड, बाळासाहेब खैरनार, रफिक शेख, अलका वाघ, राजाराम सोनवणे, प्रिती गुजराथी, हंसराज माळी, शरद केदार, विजय शिरसाठ, गोरक्षनाथ दराडे, चंद्रकला हिरे, बबन वाकळे, कविता वारूंगसे, दत्तात्रय पांगारकर, अर्चना परदेशी, सुनिल सदगीर, प्रशांत तळेकर आदी मान्यवर शिक्षकांचा समावेश होता.
व्ही. व्ही. पांडे व मा. वृषाली सानप यांनी सुत्रसंचलन तर एल.डी. बेणके यांनी आभार मानले.
उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीने हा सन्मान सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका योगिता लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा गुणगौरव समारंभ सिन्नर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या तेजोमय परंपरेचे द्योतक ठरला
