
नाशिक:- समाजातील प्रत्येक गरजूपर्यंत जाऊन दातृत्व जोपासणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिका आणि ज्येष्ठ उद्योजिका सुधा मूर्ती यांचे समाजोपयोगी सेवाभावी कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १८०वे पुष्प गुंफताना ‘सुधा मूर्ती’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे होते. प्रशांत कुलकर्णी पुढे म्हणाले की, सुधा मूर्ती यांनी नेहमीच प्रेरणादायक कार्याची दिशा देऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर उभा केला. शिक्षण, सेंद्रिय शेती, आयटी अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान दिले. संस्कारांची शिदोरी त्यांनी नव्या पिढीला दिली. सिद्धहस्त लेखिका म्हणून त्यांचा एक सरस पैलू आपल्याला प्रेरणा देणारा आहे. समाजसुधारणा, बालविवाह रोखणे, आधुनिक शेतीचा विकास, आरोग्य या क्षेत्रातही काम करणाऱ्या सुधाताईंना अनेक मानसन्मान लाभले. नम्रता हा महत्त्वाचा गुण त्यांनी आयुष्यभर जपला. यश-अपयश आपल्याला पचवता आलं पाहिजे; अशी शिकवण देणाऱ्या सुधा मूर्ती यांच्या जीवनकार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. जयश्री राणे आणि अनिल वाघ यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अजित कुलकर्णी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (९) ‘युवाकवी’ माणिकराव गोडसे ‘धन्यवाद’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
