
.सिन्नर (प्रतिनिधी)परिवर्तन पॅनेलचे पारडे जड असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे.सत्तारूढ प्रगती पॅनलने आजपर्यंत आपली अनिर्बंध सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. दोन पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद सोडल्यास गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सत्ताधारी प्रगती पॅनल चे वर्चस्व कायम राहिले आहे.संपूर्ण सिन्नर तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून,मतदान रविवार ता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.दोन्ही पॅनलने प्रचार करताना,प्रत्यक्ष गाठीभेटी वर भर दिलेला आहे.
* सत्ताधारी प्रगती पॅनलला अडचणीत आणणारे मुद्दे :* सार्वजनिक वाचनालयाचा नुकताच अमृतमहोत्सव साजरा केला, यावेळी विविध कार्यक्रमावर अफाट खर्च करून, पैशांची उधळपट्टी केली,त्याचा लेखाजोखा, सभासदांना सादर न केल्याने,प्रश्नचिन्ह उभे राहते..
* सहा महिन्यांपूर्वीच वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी (२०२५) मध्ये अपेक्षित होती,परंतु महिलांसाठी नियोजित अभ्यासिका पूर्ण न झाल्याचे कारण पुढे करून, सहा सात महिन्यांचा विलंब केला, बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर केला गेला.इतर सभासदांची मान्यता घेण्याची त्यांना गरज उरली नाही.
* आज पर्यंत तीस ते चाळीस वर्षांपासून अध्यक्ष पदापासून ते विश्वस्त यांच्या पर्यंत तेच पदाधिकारी वर्षानुवर्षे सत्तेला चिकटून बसले आहेत.
* अपवाद एखाद्या पदाधिकाऱ्याचे निधन झाले तरच नवीन पदाधिकारी तो ही त्यांच्याच मर्जीतला असतो..
* ७५ वर्षे पूर्ण होऊनही आतापर्यंत केवळ 500 सभासदा पर्यंतच त्यांची मजल गेली. कारण विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
* वाचनालयाचे सभासद करताना आपल्या मर्जीतले नातेवाईक,सगेसोयरे,मित्र यांचीच वर्णी लावली जाते.विरोधी पक्षाच्या पॅनलला काहीच किंमत देत नाही,हे कटू सत्य व दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे आजतागायत वाचनालयात प्रस्थापितांचे कायम वर्चस्व राहिले आहे.गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पॅनल मध्ये उच्च विद्याविभूषित, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर असताना देखील अल्प मतात असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.कारण आपले बहुमत कायम राहावे अशी तरतूद त्यांनी करून ठेवली आहे.
* आपल्या मर्जीतल्या लोकांना सभासद करून घेण्यात येते.या मनमानी कारभारामुळे वाचक,सभासद वैतागून गेले आहेत.नवीन सभासदांना संचालक होण्यापासून वंचित ठेवले जाते,ही शोकांतिका आहे.
* वाचन संस्कृती वाढविण्यासाठी कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत याची खंत वाटते.
* ७५ वर्षात फक्त ७००/७५० पर्यंतच वाचकांची संख्या आहे, त्यांना पण सभासद करून घेतले जात नाही,याचा खेद वाटतो.
* येथे सर्व प्रकारची वृत्तपत्र,मासिके उपलब्ध करून दिली जातात,पण दररोज वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या पंधरा ते वीसच्या आत आहे याचे सखेद आश्चर्य वाटते. संचालक मंडळ मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यांना वाचानालयाशी देणे घेणे नसते.
* गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ग्रंथालय सप्ताह आयोजित केला जातो, त्याला सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद असतो,पण या कार्यक्रमाला सर्व संचालक उपस्थित राहिल्याचे ऐकिवात नाही,इतकी उदासीनता त्यांच्यात असते.यावरून त्यांना वाचनालय व वाचनसंस्कृती बद्दल किती आस्था आहे याची प्रचिती येते
.* वाचनालयात होणाऱ्या महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमात एकदोन संचालक व दोन चार कर्मचारी उपस्थित असतात, साधारण ही संख्या आठ दहाच्या पुढे जात नाही,ते कोणालाच पाचारण करीत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
* शिवाय संबंधित महापुरुषांच्या जीवनावर एक शब्द न बोलता, प्रतिमापूजन ,अभिवादन करून, वृत्तपत्रात बातमी येण्यापूरताच हा फार्स ठरतो,हे हास्यास्पद आहे.
* वाचनालयाला विविध उत्पन्नाचे स्रोत असूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली जात नाही, तुटपुंज्या पगारात त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होते,परंतु नाईलाजास्तव ते काम करत असतात.
* वाचनालयाला अनेक वर्षांपासून नियमित देणगीदार आहेत,तसेच प्रसंगानुसार रोख तसेच स्वयंस्फूर्तीने ग्रंथांची देणगी दिली जाते, परंतु त्यांना सुध्दा वाचनालयाचे सभासद केले जात नाही,याचे आश्चर्य वाटते.
* शासन,निमशासकीय संस्थांकडून अनुदान तसेच इमारतीच्या भाड्यातून उत्पन्न मिळते,त्यासाठी संचालक बाहेरून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करतात असे वाटत नाही.
* नियमित दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेत सभासदांची नगण्य संख्या असल्याने सर्व ठराव,एकमताने मंजूर होतात.विरोधकांची संख्या कमी असल्याने आता पर्यंत निवडणुका बिन विरोध होत होत्या.यावेळी मात्र परिवर्तन पॅनलने सत्ताधारी पॅनल समोर तगडे आव्हान उभे केल्याने यावेळी इतिहास घडणार अशी वाचक,सभासद व नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रगतीवाल्यांना जंग जंग पछाडण्याची वेळ आली आहे. त्याविरोधात परिवर्तन पॅनलने घरोघर जाऊन आपली संकल्पना व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, सर्व घटकांना सभासदत्व देण्याचे आश्वासन दिल्यामुळे या वर्षी आश्चर्यकारक निकाल लागल्यास नवल वाटू नये.सुशिक्षित व सुज्ञ मतदार असल्याने या निवडणुकीत परिवर्तन करणार असल्याचे सांगून तरुणांनी निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे
.एकूण २० उमेदवार रिंगणात असून अध्यक्षपदासाठी १,उपाध्यक्ष पदासाठी २,* कार्यवाह: १, विश्वस्त पदासाठी ७,महिलांसाठी (राखीव) २ अशा एकूण १३ जागा असून, कार्यवाह पदाची निवड बिनविरोध झाल्यामुळे आता १२ उमेदवार रिंगणात आहे.प्रगती पॅनल मधून हेमंत वाजे हे कार्यवाह पदावर बिनविरोध निवडून आले आहे.
* प्रगती पॅनल चे उमेदवार पुढील प्रमाणे:
अध्यक्ष: कृष्णाजी भगत,
उपाध्यक्ष: राजेंद्र देशपांडे,नरेंद्र वैद्य,
विश्वस्त: सुनील उगले,सागर गुजर,मनीष गुजराथी,जितेंद्र जगताप,उज्वल पंडित,विलास पाटील, मनोजकुमार भंडारी, विश्वस्त महिला राखीव जागा २: निर्मल खिंवसरा,माधवी पंडित*
परिवर्तन पॅनल:*
अध्यक्ष: ऍड. शिवाजी देशमुख,
उपाध्यक्ष: राजेंद्र अंकार, नामदेव कोतवाल,
विश्वस्त: डॉ.श्यामसुंदर झळके, ऍड. चिंधु बरके, प्रा.राजाराम मुंगसे,अजय शिंदे,विश्वस्त (महिला) डॉ.कल्पना परदेशी*
रविवारी ता.७ ला मतदान असल्याने ,दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून,ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली असून,कोणत्या एका पॅनलला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता नाही. परिवर्तन पॅनल मध्ये एकूण ८ उमेदवार आहेत. विश्वस्त पदासाठी ४ तर महिला साठी १ उमेदवार असल्याने एकूण ४ उमेदवार कमी आहेत. तरीपण आहे त्या उमेदवारांना बरोबर घेऊन प्रगती पॅनलला झटका देऊ असा आशावाद परिवर्तन पॅनलचे नेते तसेच अध्यक्ष पदाचे दावेदार ऍड.शिवाजी देशमुख यांनी दिली.
