
नाशिकरोड:-(.प्रतिनिधी ) पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी तेजस आडके, पालक तानाजी आडके, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या हस्ते आणि विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनासह शालेय कामकाज उत्कृष्टपणे सांभाळले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकपद सांभाळणारा विद्यार्थी पीयूष आडके याच्यासह ओम जाधव, विकास मोरे, भाग्यश्री मुठाळ, श्रावणी गायधनी यांनी अनुभवकथन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर विचार व्यक्त केले. भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे माजी विद्यार्थी तेजस आडके यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलिक विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन केले.फोटोओळी:- शिक्षक दिनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, तेजस आडके, तानाजी आडके, विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी.
