
सोनांबे . (वसंत गोसावी, सोनांबे , प्रतिनिधी ):सोनांबे गावात दया, करुणा आणि मानवतेचे प्रतिक असलेल्या प्रेषित पैगंबर हजरत मुहम्मद स.अ.स. यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन-नबी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने गावात पारंपरिक जुलूस काढण्यात आला. गावातील हवेली पासून सुन्नी जामा मस्जिदपर्यंत झालेल्या या मिरवणुकीत ताजे, पताक्यांची सजावट, ढोल-ताशांचा गजर आणि सलाम-दारूदच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध बांधवांपर्यंत सर्वांनी या जुलूसात सहभागी होत पैगंबरांच्या शिकवणीचे स्मरण केले.सुन्नी मुस्लिम पंचकमेटी तर्फे धार्मिक व्याख्यान, सामूहिक नमाज, तसेच गरजूंसाठी अन्नवाटप यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचकमेटीचे अध्यक्ष अल्ताफ शेख, तसेच इब्राहिम शेख, वशीम शेख, राजू पठाण, जाकीर पठाण यांच्यासह के.जी.एन. ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाच्या सांगतेला सुन्नी मुस्लिम जमातचे ज्येष्ठ बांधव तथा आझाद पतसंस्थेचे चेअरमन युनूस शेख यांनी आभारप्रदर्शन केले. गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याची परंपरा अधिक दृढ केली.सोनांबे येथे झालेला हा सोहळा परंपरा, श्रद्धा आणि भाईचाऱ्याचे उत्तम उदाहरण ठरला. ईद-ए-मिलाद म्हणजे काय ?ईद-ए-मिलादुन-नबी म्हणजे प्रेषित पैगंबर हजरत मुहम्मद स.अ.स. यांच्या जन्मदिनी साजरा होणारा इस्लाम धर्मातील एक महत्त्वपूर्ण उत्सव. या दिवशी मुस्लीम समाजात पैगंबरांच्या जीवनकार्याची आठवण करून त्यांचा दया, शांतता, समानता व बंधुभावाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो.
