
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी ):”गुरु हा केवळ मार्गदर्शक नाही, तर तो संस्कारांचा शिल्पकार आहे. समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे,” अशा शब्दांत सिन्नर तालुका बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या वतीने पंचवटी मोटेल्स येथे पार पडलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्याचे महत्व अधोरेखित झाले. तालुक्यातील विविध शाळांतील मान्यवर शिक्षकांचा सत्काराने वातावरण स्फूर्तीमय झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विनोद शितोळे (शहराध्यक्ष) यांनी भूषवले. त्यांनी मनोगतात म्हटले – “शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या हातात संस्कृतीचा पाया घडतो, त्यांचा गौरव करणे म्हणजे संपूर्ण समाजाचा गौरव करण्यासारखे आहे.”संघटनेचे जिल्हा सचिव अनिल सरवार म्हणाले – “जगण्यात आई-वडील जन्म देतात, पण खरे आयुष्य जगायला शिकवतात ते आपले गुरुजन.

त्यांच्यासमोर प्रत्येकजण सदैव ऋणीच राहतो.”सहखजिनदार रविंद्र गिरी यांनी नमूद केले “आज ज्येष्ठ व कार्यरत शिक्षकांचा सन्मान करून आम्ही फक्त आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण त्यांच्या ज्ञानसेवेची किंमत मोजता येणार नाही.”खजिनदार दत्ताजी गोळेसर यांनी शुभेच्छा देताना सांगितले – “गुरुजनांच्या स्मृती आणि संस्कारामुळेच समाजाला प्रगतीची दिशा मिळते. हा सोहळा म्हणजे आपल्या परंपरेतील गुरुश्रद्धेचा सुंदर आविष्कार आहे.” सत्कारार्थी मान्यवर शिक्षकांमध्येसेवानिवृत्त कलाशिक्षक हेमंत देवनपल्ली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम सदगीर, पाटोळे शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी, शिवव्याख्याते जावेद शेख, तसेच किरण मिठे, राजू कांबळे, शाम गोसावी, अरुण रूपवते, रविंद्र सातव, विजय कोळी, श्री. शिलावट, दादा बर्गे, अनिल भादेकर, योगशिक्षक राजेंद्र नन्नवरे, संतोष जाधव, श्री. खोलमकर, सोमनाथ बोडके, साहेबराव बोराडे, सोमनाथ पथवे, प्रा. अमोल चिने, श्री. राजगुरू, सुरेखा जगताप, भानुदास बेणके आदींचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला

.शिक्षकांच्या वतीने बोलताना वसंत गोसावी यांनी कृतज्ञता व्यक्त केली – “हा सन्मान आमच्या व्यक्तिगत गौरवाचा नसून संपूर्ण शिक्षकवर्गाच्या कष्टांचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाचा आहे. हा सोहळा आम्हाला आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देतो.”
तर उदय देवनपल्ली म्हणाले “ज्ञानदान हा आमचा व्यवसाय नाही, ती आमची साधना आहे. समाजाने ही साधना ओळखून दिलेला हा सन्मान आम्हाला अविस्मरणीय ठरेल.”कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल सरवार यांनी केले. शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सन्मान सोहळा म्हणजेच गुरुवर्यांप्रतीची कृतज्ञतेची अखंड ज्योत ठरली.
