
पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा महोत्सव म्हणून शिक्षक दिन मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली.या दिवशी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची भूमिका निभावत अध्यापन कार्याचा भार उचलला. लहानशा वयात शिक्षक बनण्याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी हास्य, वर्गातली शिस्तबद्ध मांडणी आणि शिकवताना उमटलेला आत्मविश्वास पाहून सर्वच उपस्थित थक्क झाले.मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून डॉ. राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र उलगडले. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि तत्त्वज्ञानपर कार्य सांगताना शिक्षक या शब्दामागे असणारी महान जबाबदारी विद्यार्थ्यांना पटवून दिली. तसेच शिक्षक दिन का साजरा करतो? त्यामागची परंपरा, कृतज्ञतेची भावना व गुरू-शिष्य नात्याची महत्ता याविषयी त्यांनी अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व संयोजन सुनिता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, अनिता दातीर, स्वाती खताळे, सुनीता भिसे आदी शिक्षकांनी केले. त्यांच्या परिश्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व आकर्षकतेने पार पडला.विद्यार्थ्यांचा चमकता सहभाग -या दिवशी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गात उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानस चकोर, साई चकोर, ओमकार सांगळे, अजिंक्य जेडगुले, रविंद्र मंडले, साहिल गोफणे, शुभम गोफणे, सौरभ दळवी, ज्ञानेश्वर गांगुर्डे, आदित्य खताळे, अविष जाधव, कोमल कराड, पूर्वा कराड, सिद्धी कराड, देवयानी थोरात, कार्तिकी शिरसाट, प्रिया राजेंद्र खताळे, प्रिया ज्ञानेश्वर खताळे, श्रद्धा खताळे, आयेशा मणियार, ईश्वरी चव्हाण यांचा समावेश होता. त्यांनी शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली

आणि शिक्षणाच्या पवित्र कार्याला बालहृदयातून सन्मान दिला.विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या अभिनव प्रयोगामुळे शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लहान मुलांनी घेतलेली गुरूची भूमिका पाहून शिक्षणाची दिव्य परंपरा किती पवित्र आहे याचा प्रत्यय सर्वांना आला. अशा या विद्यार्थ्यांनी साजऱ्या केलेल्या शिक्षकदिन सोहळ्याने पाटोळे गावात ज्ञानदीप प्रज्वलित केला असून, गुरू-शिष्य परंपरेचे हे अनोखे चित्र सर्वांच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहे.
