
नांदगाव( वार्ताहार ) आज दिनांक पाच सप्टेंबर 2025, गुरुवार रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. जे. हायस्कूल या विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शाळेच्या गीतमंचाने इशस्तवन सादर केले. त्याचवेळी माजी राष्ट्रपती डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे , उपमुख्याध्यापक श्री जोगेश्वर नांदुरकर ,दोन्ही सत्राचे शिक्षक प्रतिनिधी श्री प्रवीण अहिरे, श्री. सुरेश नवसारे, टी.एम. बोर्ड सदस्य श्री गुलाब पाटील ,सौ रूपाली झोडगेकर तसेच आज रोजी मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेले विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते

. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. लोहाडे , माजी पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री संदीप जेजुरकर व इतर पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी भूमिका हिरे आज रोजी तिने विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून भूमिका पार पाडली. उपस्थितांचा परिचय व स्वागत विद्यार्थी शिक्षिका कुमारी समृद्धी बोडके व कुमारी गौरी गायकवाड यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक म्हणून ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वानुभव आले ते अनुभव मांडताना कु .उर्वी आहेर, कु.साची अत्रे, कु.वेदीका पगार, कु.साई चोळके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून दाखवले. “शिक्षक होणे हे वाटते तेवढे सोपे नाही. वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कंट्रोल करता करता दमछाक झाली,याची कबुली त्यांनी आपल्या मनोगतातून दिली. तरीही पुढे जाऊन संधी मिळाल्यास नक्की शिक्षक होण्याचा प्रयत्न करू” असे त्यांनी आश्वासित केले. विद्यार्थ्यांचे पाठ निरीक्षण करण्याचे काम विद्यालयातील शिक्षकांनी केले. त्याबद्दलचे आपले अनुभव ज्येष्ठ शिक्षक श्री गुलाब मोरे सर आणि श्री विलास काकळीज यांनी त्यांना पाठ निरीक्षण करताना आलेले अनुभव सांगितले. एकुण १५०
विद्यार्थ्यांनी आजच्या शिक्षक दिनामध्ये आपला सहभाग नोंदविला.

या सर्व विद्यार्थी शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार व कौतुक करण्यात आले. पालक शिक्षक संघाच्या वतीने देखील विद्यालयात सद्यस्थितीत काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. सत्कार वाचनाची जबाबदारी इ. १०वी वर्गशिक्षक श्री राकेश नन्नावरे यांनी पार पाडली. उपस्थित मान्यवर आणि पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्यावतीने सर्व शिक्षकांना छोटीशी भेट वस्तू देऊन त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी उत्स्फूर्तपणे पालक शिक्षक संघाच्या वतीने श्री अनिल थोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी उपाध्यक्ष व ए.बी.पी. माझा चे पत्रकार श्री. संदीप जेजुरकर यांनी यांनी आपल्या मनोगतातून, “शाळेचे नाव कमवा” हा संदेश दिला. सोबतच त्यांनी शाळेचे कौतुक देखील केले आणि शालेय जीवनात मिळालेली शिदोरी आपल्याला पुढे नक्कीच उपयोगात येईल अशी सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनातील अनुभवांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून प्रेरणा दिली. आज ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून काम पाहिले त्यांना अधिक सराव व्हावा या हेतूने किंवा अधिक अनुभव यावा या उद्देशाने महिन्यातल्या एका शनिवारी विद्यार्थ्यांनी वर्गात शिकवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.मनोगतातून विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे यांनी “शिक्षक दिन म्हणजे एक कृतज्ञता सोहळा आहे. त्या दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दलच्या भावना व्यक्त कराव्यात. सोबतच अलीकडच्या काळामध्ये पारंपारिक शिक्षण पद्धतीला पुढे नेत असतानाच आपण अपडेट राहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे” हा संदेश दिला. शिक्षक होणे सोपे नाही ‘जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे’ या म्हणीचा अर्थ त्यांनी उलगडून दाखवला. डॉ राधाकृष्णन यांच्या जीवनातील प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी सिद्धी पवार व कुमारी उन्नती इप्पर हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले.श्री गुलाब पाटील यांनी पालक शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांचे पुनश्च एकदा गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रांगेने गुरुदक्षिणा सभागृहाच्या बाहेर भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु संस्कृती गायकवाड व कु .वेदश्री कदम यांनी अतिशय अलंकारिक भाषेमध्ये केले. सदर कार्यक्रम पालक शिक्षक संघाच्या सहकार्याने आणि मा. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांचे मार्गदर्शनाने, दहावीचे सर्व वर्ग शिक्षक सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.’
