
नांदगाव ( प्रतिनिधी). आज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘वनस्पती शास्त्र’विभागाने *’वनस्पती उत्सव’* आयोजित केला. याप्रसंगी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. वनस्पती प्रदर्शन दालनाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.मा.अमित बोरसे- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

वनस्पती उत्सवात 100 पेक्षा अधिक वनस्पतींचे गुणधर्मासहित प्रदर्शन मांडण्यात आले. त्यात काही औषधी दुर्मिळ वनस्पतींचाही समावेश होता. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘बीज राखी’ व ‘पुष्पप्रदर्शन’ सुद्धा आयोजित केले होते. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक पालेभाज्यांचे प्रदर्शन होय. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंजि.मा.अमित बोरसे-पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्थानिक वनस्पतींचे गुणधर्म थक्क करणारे असून या वनस्पतींचे संवर्धन करणे व व वनस्पती संबंधित उपलब्ध माहितीचे जतन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादित केले.

आज मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांवर व वनस्पतींवर कीटकनाशके व रासायनिक फवारणी केल्यामुळे मानवाला दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मानवाला निरामय आरोग्य प्राप्तीसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रभावी ठरते. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ वनस्पतींचा औषधी निर्मितीसाठी किंवा औषध म्हणून वापर केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करण्याचे याप्रसंगी आवाहन केले. वनस्पती शास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी *वनस्पती उत्सवाचे* यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. ‘वनस्पती उत्सव’ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन दुर्मिळ वनस्पतींचे संकलन करून मांडलेल्या प्रदर्शन उपक्रमांचे कौतुक केले. मानवी जीवनात वनस्पतीच्या शास्त्रीय माहितीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले.वनस्पतींच्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर व्यक्तीला प्रगती साधता येत असल्याचे सांगून वनस्पतीच्या शास्त्रीय माहितीचे महत्व अधोरेखित केले.

वनस्पतींचे विविध फायदे व व्यावसायिक महत्व सुद्धा याप्रसंगी विशद केले. मंचावर न्यू इंग्लिश स्कूल नांदगावचे शालेय समिती अध्यक्ष श्री विजय काकळीज, वरिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य डॉ.प्रवीण निकम,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए मराठे, डॉ.पी.टी.निकम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के.आर.खंदारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.मदने यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वृषाली गाजरे-पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.सागर भागवत यांनी केले. वनस्पती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक,सेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
