
लासलगाव, दि.४ सप्टेंबरः (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ.सर्वपिल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वी च्या विदयार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडून शिक्षकांच्या मेहनतिची व कष्टाची जाणीव आपल्या सहकार्यांना करून दिली. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन केले. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उत्तम तयारी करून, वर्गावर्गात जाऊन उत्तम प्रकारे शिकविले. त्यानंतर सर्व उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्याकडून गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या शिक्षकांविषयी मनोगत देखील याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रा.किशोर गोसावी होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना ते हणाले की, ‘विद्यार्थ्यांना समजून घेणे ही अवघड कला शिक्षकांकडे असते. शिक्षकांना वेळप्रसंगी कठोर बनावे लागते. यामागचा हेतू एवढाच की विद्यार्थी शिकून शहाणा झाला पाहिजे. यासाठी शिक्षक हा स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्याचा वापर विद्यार्थी घडविण्यासाठी करतो. पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे समाजाच्या प्रगतीमध्ये असणारे योगदान स्पष्ट करताना म्हणाले की, ‘विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून तो शिक्षकांच्या भूमिकेत देखील आहे. त्यामुळे त्याला आदराचे स्थान दिले जाते. विद्यार्थ्यांनी “आईवडील, गुरुजन, थोर समाजसेवक, ग्रंथ, निसर्ग या प्रत्येकाकडून चांगले गुण घ्या असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाचे सादरीकरण व सूत्रसंचालनही विद्यार्थी-शिक्षकांनीच केले. पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार व शिक्षक यांनी विद्यार्थी शिक्षकांचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
