
नाशिक:- (प्रतिनिधी ) छत्रपती संभाजी नगर रोडवरील बळी मंदिरासमोर असलेल्या पार्कसाईड होम्स या भव्य गृहप्रकल्पात गणेशोत्सवानिमित्त अनोख्या ‘काव्ययात्रा’ या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. रानकवी तुकाराम धांडे, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र उगले, प्रशांत केंदळे, प्रा.राजेश्वर शेळके, शुभांगी पाटील आणि रवींद्र मालुंजकर यांनी सहभाग घेतला.

रानकवी तुकाराम धांडे यांनी ‘आई होती तेव्हा, तुकोबा आणि आजोबा’ तसेच पाठ्यपुस्तकात प्रकाशित झालेली ‘पोर डोंगरावं भाळली…’ ह्या कविता गावरान शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कवी आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी विविध किस्से आणि ‘मागणे तसे हे साधे, मज माणूस होता यावे…’ ही कविता सादर करून मैफिलीत रंग भरला. कवी राजेंद्र उगले यांनी ‘नाही गेलो पंढरीला; नाही गाईला अभंग, बापामध्येच शोधला; पंढरीचा पांडुरंग…’ या कवितेने पित्याचे महत्त्व अधोरेखित केले.

युवाकवी प्रशांत केंदळे यांनी ‘जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको…’ ही गझल सादर करून पत्नीप्रेमाची महती गायली. तर शुभांगी पाटील यांनी गोड गळ्याने सादर केलेल्या कवितांतून स्त्रियांविषयीची भावना जपली. प्रा.राजेश्वर शेळके यांनी ‘शाळेमध्ये आले बघ बूट आणि टाय, मलाबी आनशीन का बाजारातून माय…’ ही कविता सादर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक नेते प्राचार्य संजय चव्हाण, सुनील खापरे, शरद धनवटे, डॉ.सुनीता गांगुर्डे, राकेश नारंग, विष्णुपंत शिंपी आणि पार्कसाईड होम्स सांस्कृतिक मंडळाने केले.
