
नाशिक:- (प्रतिनिधी ) परिस्थितीला गुलाम करून मुकाटपणे अन्याय सहन न करता त्याविरूद्ध आवाज उठवला पाहिजे. शरणागती पत्करण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध लढा देणे म्हणजे विद्रोह होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.निशांत गुरू यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १७९वे पुष्प गुंफताना ‘वाघिणीचे दूध’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करीत होते. ज्येष्ठ विचारवंत तुकाराम ढिकले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा.गुरू पुढे म्हणाले की, विद्रोह म्हणजे जातीपातीचे राजकारण नाही तर सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याची दिशा दाखविणारे कार्य करून माणसामाणसात भेदभाव करणाऱ्यांवर प्रहार करायला हवा. विद्रोह देशविघातक, समाजविघातक नसतो. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. कारण शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे. वंचित समाजासाठी समता, बंधुता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भेदभाव दूर करून आदर्श समाजव्यवस्था निर्माण करायला हवी. या पुस्तकात अशा विविध आशयाच्या रचना आहेत, असे सांगून संग्रहातील काही कविता सादर केल्या. अजित कुलकर्णी आणि बाळासाहेब उगले यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ साखरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (५) प्रशांत कुलकर्णी ‘सुधा मूर्ती’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
