
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील मल्हार प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळ आणि मालेगाव येथील बालाजी मल्टीस्पेशल हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी शिबिरात बालरोग, अस्थिरोग, ह्रदयरोग, स्त्रीरोग, दंत चिकित्सक, रक्त तपासणी, नेत्रतज्ञ, जनरल सर्जन आदी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने परिसरातील नागरिकांची तसेच गो. य. पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधोपचार केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासकीय योजनेत चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सुविधा सहज व सुलभ पध्दतीने उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना वेळीच अल्पदरात औषधोपचार मिळावे याहेतूने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी सांगितले.

शिबिरात विविध विकारांच्या जवळपास सातशेहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक दातृत्वाची जाणिव ठेवून मालेगाव येथील बालाजी मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलच्या वतीने सदर शिबीरचे आयोजन केले होते. गणेश उत्सवात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत मंडळाने राबविलेल्या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली. बालाजी हाॅस्पिटलतर्फे जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मोफत सर्वरोग निदान शिबीरे वर्षभर आयोजीत करुन मोफत औषधोपचार केले जातात असे डॉ. निवेदिता हिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. समवेत तुषार नरवडे, समाधान शिंपी, आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने नागरिकांवर मोफत उपचार करत गोळ्या औषधे डोळ्यांचे ड्राॅप आदींचे वाटप केले. प्रसंगी महेंद्र पाटील, जळगांव निंबायतीच्या सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, गो. य. पाटील विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पवार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, जेष्ठ नागरिक सर्व संस्थांचे पदाधिकारी, तरुण युवक, मित्र परिवार आदी उपस्थित होते. अध्यक्ष विरेंद्र पाटील, उपाध्यक्ष आकाश चितळकर, खजिनदार बबलू पाटील, मंडळाचे कार्यकर्ते प्रतीक दुकळे, तुषार दुकळे, सूरज काळे, शुभम दुकळे, संदीप खरे, गणेश परदेशी, पप्पू कोळपे, कल्पेश दुकळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरास पंचक्रोशीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
