
नाशिक (प्रतिनिधी ) सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग सभागृह, नाशिक येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक यांनी 31ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला.भटक्या विमुक्त दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन,उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य,परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक,शैक्षणिक व माहितीपर उपक्रम या विषयावर सिन्नर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामित्र दत्ता वायचळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.याप्रसंगी व्यासपीठावर इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिकचे प्रादेशिक उपसंचालक मा.श्री.भगवान वीर, सहाय्यक संचालक मा.श्री.संतोष चव्हाण, मा.श्री.सुभाष फड,मा.श्री.सुदर्शन चव्हाण, मा.श्री.जी.आर.आव्हाड आदी उपस्थित होते.* *आपल्या व्याख्यानात महामित्र दत्ता वायचळे यांनी भटके विमुक्त तसेच धनगर समाजाचा संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला. भटके विमुक्त समाज एकेकाळी भारतीय गावगाड्याशी आणि वैभव संपन्न समाजाशी जोडला गेलेला समाज होता.भव्य मंदिरे, अजंठा-वेरूळ सारखे शिल्पे, कृषी आणि विज्ञान, वैद्यकशास्त्र, शस्त्र निर्मिती,भविष्यशास्त्र, मनोरंजन इत्यादी विषयात पारंगत होता.भटक्या विमुक्तांनी इंग्रजांचे राज्य नाकारले व स्वराज्यासाठी संघर्ष उभा केला म्हणून इंग्रजांनी भटक्या विमुक्तांना जन्मजात गुन्हेगार ठरवून तुरुंगात टाकले म्हणून समाज त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून बघू लागल्याचे सांगितले.* *भटक्या विमुक्त जाती जमातींच्या नावांप्रमाणेच या जाती जमाती भटकत असतात त्यामुळे अनेक वर्ष होऊन देखील हा समाज विकासापासून वंचित आहे कारण या समाजामध्ये रोजगाराच्या समस्या, शिक्षणाचा अभाव,आरोग्याच्या समस्या, राहण्याची ठिकाणे स्थिर नसल्याच्या समस्या,अज्ञान, दारिद्र्य,व्यसनाधीनता, पारंपारिक व्यवसायांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी इत्यादी समस्यांमुळे हा समाज आजही मागासलेला असल्याचे स्पष्ट केले.* *भटक्या विमुक्तांच्या समस्या निवारणासाठी भटके विमुक्त विकास परिषद, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम, स्वावलंबनाच्या क्षेत्रातील कामगिरी,सुरक्षा,क्रीडा संकुल,आश्रमशाळा, सांस्कृतिक दल, स्वावलंबनाच्या क्षेत्रातील कामगिरी, शबरी माता कन्या वसतिगृह,पालावरची शाळा, अभ्यासिका,आरोग्य शिक्षण व आरोग्याचा अभिनव प्रयोग, भटके विमुक्त कल्याणकारी परिषद अशा विविध माध्यमातून भटक्यांना स्थिरस्थावर करण्याचे प्रयत्न करता येतील असे वायचळे यांनी विषद केले.* *शेवटी दरवर्षी 31ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून नव्हे तर “भटके विमुक्त सन्मान दिन” म्हणून साजरा करण्याचे आवाहन महामित्र दत्ता वायचळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री.जे.जी.सैय्यद,श्री.एस.एस. राठोड,श्री.जी.आर.वरखडे, श्री.संदीप आव्हाड,तसेच मुख्याध्यापक श्री.जाधव,श्री. थोरात,श्री रनाळकर आदी उपस्थित होते.*
