
गडचिरोली (प्रतिनिधी ) स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते. या कवितांना मासिक उत्कृष्ट कविता व कवीला उत्कृष्ट कवी म्हणून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने पुरस्कृत करण्यात येते. कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांचे गौरविण्यात येते.या उपक्रमाचे द्वितीय सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता ‘आषाढ वारी, श्रावण धारा, तसेच सण व उत्सव’, असे तीन विषय देण्यात आले होते. यात ३८ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ७९ कविता सादर केल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून इंदिरानगर (गडचिरोली) येथील राजरत्न पेटकर यांच्या ‘आषाढ वारी’ या विषयावरील ‘विठ्ठला’ या कवितेस प्रथम, बल्लारपूर (चंद्रपूर) येथील प्रसिद्ध कवी सुनील बावणे यांच्या ‘सण व उत्सव’ या विषयावरील ‘सणासुदीचा श्रावण’ या कवितेस द्वितीय व नागपूर येथील कवयित्री सौ. सुरेखा बोरकर यांच्या ‘श्रावणधारा’ या विषयावरील ‘श्रावण सरी’ या कवितेस तृतीय क्रमांकाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रसिद्ध कथाकार कवी प्रमोद बोरसरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले आहे.कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या स्पर्धेत प्रामुख्याने संजय कुनघाडकर, खेमदेव हस्ते, अशोक कांबळे,अतुल गंडाटे, रंजना चुधरी, प्रा. कृष्णा कुंभारे,नथ्थुजी चिमुरकर, राजेंद्र सोनटक्के, राजेश बारसागडे, सौ. वैजयंती गहूकर, अहिंसक दहिवले, उकंडराव राऊत, सिध्दार्थ गोवर्धन, रोशनी दाते, विलास जेंगठे, यामिनी मडावी, आत्माराम बर्डे, सुनील शेरकी, ज्योत्स्ना बन्सोड, डॉ. केशनी हटवार, पी.डी. काटकर, सुभाष धाराशिवकर, सुनील बावणे, बाबुलाल राठोड, राजरत्न पेटकर, सोनाली रायपुरे, वंदना मडावी, सुरेश गेडाम, प्रिती चहांदे, सुरेखा बोरकर, शैला चिमड्यालवार, हरिष नैताम, मधुकर दुफारे,मंगला कारेकर, पुरुषोत्तम दहिकर, वंदना सोरते,सुजाता अवचट व प्रा. सरिता बुटले इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार आहे. – *चुडाराम बल्हारपुरे* (नाटककार)
