
पंचवटी, नाशिक (दि. ३० ऑगस्ट): उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तावृद्धी आणि नॅक मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या नव्या बदलांविषयी प्राध्यापकांना सविस्तर माहिती देण्यासाठी समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “नॅक मूल्यांकन कार्यशाळा (बायनरी ग्रेडिंग सिस्टम)” या कार्यशाळेत लोकनेते व्यंकटराव हिरे आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, पंचवटी, नाशिक या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले.
ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे आणि महाविद्यालय विकास समिती प्रमुख डॉ. संतोष तांबे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात हि प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्व्लन करून करण्यात आली. महाविद्यालयाचे नॅक व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. चेतन बागुल यांनी आपल्या प्रस्तावनेत नॅक मूल्यांकन याबद्दल माहिती देऊन या कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी आपल्या मनोगतात नॅक मूल्यांकन ही केवळ गुणांकनाची प्रक्रिया नसून महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचे व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले.“बायनरी ग्रेडिंग सिस्टिम महाविद्यालयांना पारदर्शकता, जबाबदारी आणि शैक्षणिक गुणवत्ता राखण्यास प्रवृत्त करणारी आहे,”असे त्यांनी मत व्यक्त केले.
तद्नंतर, महाविद्यालय विकास समिती प्रमुख डॉ. संतोष तांबे यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया ही शैक्षणिक तसेच सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी असल्याचे सांगितले.त्यांनी अल्युमनी नेटवर्क, इंडस्ट्रियल सहयोग, दस्तऐवजीकरण, स्थानिक समाजाशी असलेला संवाद या घटकांचा महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यात मोठा वाटा असल्याचे नमूद केले. तसेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी नवकल्पनापूर्ण अध्यापन पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले.
नॅक मूल्यांकन कार्यशाळेसाठी लाभलेले प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी बायनरी ग्रेडिंग सिस्टम विषयी सखोल माहिती दिली. यामध्ये अभ्यासक्रम रचना, शिक्षक संसाधने, पायाभूत सुविधा, आर्थिक साधन संपत्ती व व्यवस्थापन, अध्ययन व प्रशासन, अभयसाचे परिणाम, संशोधन व नाविन्यपूर्ण निष्कर्ष, शाश्वतता परिणाम, विद्यार्थी सहाय्य व विकास, संस्थात्मक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचा समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, अल्युमनी मीट, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आयोजित कराव्यात, त्यांचे सविस्तर रेकॉर्ड व विद्यार्थी फीडबॅक ठेवावा, असे त्यांनी सुचवले. कौशल्याधारित शिक्षणासाठी त्यांनी NSQF (National Skills Qualification Framework), NHEQF (National Higher Education Qualification Framework) याबद्दलही माहिती दिली. या चौकटीत बसणारे कौशल्याभिमुख अभ्यासक्रम महाविद्यालयाने राबवावेत. तसेच अशा कोर्सेसना BoS (Board of Studies), Senate किंवा Academic Council कडून मान्यता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच प्राचार्य डॉ.बी. एस. जगदाळे यांनी शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचे योग्य दस्तऐवजीकरण करण्यावर भर दिला. महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालात शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम, व्याख्याने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम, ग्रंथालय सुविधा, क्रीडा कार्यक्रम व सुविधा यांचा समावेश करून त्याचे व्हिडिओ, चित्रफिती, महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी सांगितले. यासोबतच महाविद्यालयाने तयार केलेल्या विविध समित्या व त्यांची प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedures) देखील नियमित अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तद्नंतर त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. विशेषतः हॉटेल मॅनेजमेंटसारख्या व्यावसायिक क्षेत्रातही भारतीय परंपरेतील संकल्पना व अभ्यास विषयांचा अभ्यासक्रमाशी समन्वय साधावा, असे त्यांनी सुचवले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी SWAYAM, NPTEL सारख्या ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, यासाठी त्यांनी प्रेरणा दिली.
आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. बी. एस. जगदाळे यांनी सांगितले की, “नॅक मूल्यांकन ही फक्त औपचारिक प्रक्रिया नसून ती महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचे, विद्यार्थ्यांप्रती व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रत्यक्ष दर्शन आहे. प्रत्येक प्राध्यापकाने आपल्या कार्यामध्ये प्रामाणिकपणा, नावीन्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तत्परता दाखवली, तर महाविद्यालय निश्चितच उच्च दर्जा मिळवू शकते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश तेलतुंबडे यांनी आभारप्रदर्शन केले. त्यांनी प्रमुख व्याख्याते डॉ. बी. एस. जगदाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना नव्या मूल्यांकन पद्धतीचे सखोल ज्ञान मिळाल्याचे सांगितले. तसेच या कार्यशाळेच्या संकल्पक डॉ. अपूर्व हिरे व डॉ. संतोष तांबे यांचे विशेष आभार मानून, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, नॅक व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. चेतन बागुल, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. डॉ. गणेश तेलतुंबडे यांनी पुढेही अशा शैक्षणिक कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व चारित्र्य विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. या कार्यशाळेतून सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना नॅक मूल्यांकनाची नवी दृष्टी मिळाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बायनरी ग्रेडिंग सिस्टम प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
