
विंचूर दि.३०(प्रतिनिधी, संदिप शिरसाट) आजच्या युगात मनुष्याच्या अंगी हव्यास, मी पणा, दांभिकता, अहंकार, स्वार्थ, इर्षा, द्वेष असे वाईट विकार वाढीस लागलेले आहेत. अशा वाईट गुणांचा त्याग करून प्रभू श्रीरामांच्या अंगी असलेल्या प्रेम, शांती, शितलता, शालीनता, माधुर्य, त्याग, वडीलधाऱ्यांप्रती व गुरुजनांप्रती आदर, लहानांप्रती ममत्व,लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या प्रती असलेला बंधू भाव व मैत्रांप्रती असलेला मैत्री भाव अशा अनेक गुणांपैकी मनुष्याने प्रभू श्रीरामांचा एक तरी गुण अंगीकारावा. असे प्रतिपादन नागपूर येथील विद्यावाचस्पती ह.भ.प. विवेक घळसासी यांनी केले. घळसासी हे येथील निसर्ग मंगल कार्यालयात कै. विमल वासुदेव दुसाने यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित सात दिवसीय संगितमय रामकथेचे चौथे पुष्प गुंफताना बोलत होते.पुढे बोलताना घळसासी यांनी सकल विश्वाला आनंद देणारे व मानवाचे कल्याण करणारे राम नाम सदैव घ्या. रामनामाने स्वपरिचय होतो.स्वपरिचय झाल्यास आत्मविश्वास, भक्ती, ज्ञान, सात्विकता वाढून आत्मिक सुख व शांती मिळते. देवाकडे प्रसाद मिळवण्यासाठी नाही तर प्रासादिकता मिळवण्यासाठी जा.ज्ञानी जणांचा आदर करा,कायम विद्यार्थी बनून रहा, दुसऱ्याचे कौतुक करण्याचे सामर्थ्य ठेवा.दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना.असे ज्ञानामृत दिले. यावेळी वारकरी सांप्रदाय व विंचूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप कोथमिरे यांनी केले तर अतुल दुसाने यांनी आभार मानले.
