
घरोघरी गौरींचे उत्साहात आगमन झाले, त्यानिमित्त केलेली आकर्षक सजावट…. छायाचित्र :श्यामसुंदर झळके,सिन्नर
सिन्नर (प्रतिनिधी) येथे गणरायाच्या आगमनानंतर आज (ता.३१) ज्येष्ठा गौरींचे उत्साहात अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन झाले.तीन दिवस चालणाऱ्या या सणामुळे घरात भक्तीमय , मांगल्याचे वातावरण तयार होते.पहिल्या दिवशी आवाहन करून,घरासमोर अंगणात सुंदर आकर्षक रांगोळी काढून, पाटावर गौराईंचे मुखवटे ठेऊन विधीवत पूजन केले जाते.त्यांना वाजत गाजत आणून, घरात सुशोभित केलेल्या आसनावर स्थानापन्न केले जाते.त्यांना सुंदर साड्या परिधान करून अंगावर सुंदर अलंकार चढविले जातात.यथाविधी पूजा,आरती करून, त्यांना मेथीची भाजी,भाकरी व वरणभाताचा तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो.दुसऱ्या दिवशी गौराइंचे चे यथाविधी पूजन केले जाते.संध्याकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात.त्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने साडी परिधान करून,एकमेकांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करतात. तिसऱ्या दिवची विसर्जन केले जाते.प्रत्येक भागात गौरी पूजन करण्याच्या विविध पद्धती आढळतात.दोन्ही गौराईंच्या मध्ये गणपतीलाही स्थान दिले जाते. ज्येष्ठा गौराई येणार म्हणून महिलांची आठ दहा दिवसांपासून लगबग सुरू असते.
