
लोहोणेर-:( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के.ए.शिंदे होत्या तर उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर,पर्यवेक्षक व्ही.एम.निकम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच खेळाच्या साहित्याचे पूजन करून क्रीडा संस्कृतीबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.प्रास्ताविकातून शिक्षक सुनिल एखंडे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाविषयी माहिती देताना सांगितले की २९ ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन साजरा केला जातो. त्यांनी आपल्या कौशल्याने भारताला तीन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले. क्रीडा दिन आपल्याला केवळ त्यांचे स्मरण करून देत नाही,तर खेळाचे जीवनातील महत्त्व पटवून देतो. खेळामुळे शिस्त, आरोग्य,आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते.यानंतर शाळेतील क्रीडा शिक्षक शशिकांत आहेर,शशिकांत ठाकरे आणि विजय निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका के. ए.शिंदे म्हणाल्या की खेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढत नाही, तर संयम, संघटन वृत्ती, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता वाढते. खेळाडू मैदानात पडतो, उठतो,परत प्रयत्न करतो हेच जीवनातील संघर्षाचे धडे आपल्याला खेळ शिकवतो.आजच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल वा टीव्हीवर वेळ वाया घालवण्याऐवजी दररोज किमान एक खेळ खेळण्याची सवय लावावी.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले. *फोटो ओळ-: लोहोणेर येथील जनता विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच खेळाच्या साहित्याचे पूजन करताना नितीन आहेर,मुख्याध्यापिका के.ए.शिंदे,पर्यवेक्षक व्ही.एम.निकम आदींसह उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.(छाया-: सुनिल एखंडे)*
