
नाशिक (प्रतिनिधी):-समाज सुदृढ होण्यासाठी विश्वास आणि श्रद्धेची आवश्यकता असते. अंधश्रद्धेमुळे गैरसमज निर्माण होतात आणि समाजाची अधोगती होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.किशोर पवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ते १७८वे पुष्प ‘अंधश्रद्धेचे ग्रहण’ या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. प्रा.चंद्रकांत दराडे अध्यक्षस्थानी होते. डॉ.पवार पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. या पुस्तकात नवस,अंधश्रद्धा यासारख्या विषयावर मंथन केले आहे. बहुतांशी लोक वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास न करता विज्ञानाला आव्हान देत अंधश्रद्धेचा अंगीकार करतात, हे आपले दुर्दैव आहे. चमत्काराला नमस्कार करणारा समाज सत्य समजून घेत नाही. विवेकबुद्धी खुंटीला टांगून समाज विनाशाकडे जात आहे. यासाठी समाज जागृतीची गरज आहे, असेही ते म्हणाले. शांताराम वाघ आणि बाबुराव घुगे यानां ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचलन केले तर प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी आभार मानले. येत्या मंगळवारी (२) प्रा.निशांत गुरू ‘वाघिणीचे दूध’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
