
नांदगाव -(प्रतिनिधी )मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण अशोक मार्कंड व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांचे जीवन कार्याचा परिचय करून दिला. उपशिक्षक वाळू बागूल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना २९ ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आणि म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी भारताला १९२८, १९३२, १९३६ च्या ऑलम्पिक मध्ये हॉकी मध्ये ३ सुवर्णपदक मिळवून दिले. मेजर ध्यानचंद यांची कामगिरी बघून हुकुमशहा हिटलरने त्यांना जर्मनीकडून खेळण्याची व सैन्य दलात मोठे पद देण्याची प्रयत्न केला होता, जो त्यांनी विनम्रपणे नाकारले. यातून मेजर ध्यानचंद यांचे राष्ट्रप्रेम दिसून येते हे सांगितले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश खेळाचे महत्व आणि शारीरिक तंदुरुस्ती बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर मैदानी खेळ देखील खेळले पाहिजे. ध्यानचंद यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना १९५६ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
