
नांदगाव,(प्रतिनिधी )दि. २९ : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन बजरंगबली व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.प्रास्ताविकात सूत्रसंचालक श्री. एल. एम. गळदगे यांनी क्रीडामूल्यांचे व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व अधोरेखित केले

. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. १९२८, १९३२ व १९३६ च्या ऑलिंपिकमध्ये सलग तीन सुवर्णपदके मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार विजेते ॲड. गोरखनाथ बलकवडे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर ॲड. गोरखनाथ बलकवडे यांनी “क्रीडा संस्कार व शिस्त” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी क्रीडेमुळे होणारा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास अधोरेखित केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संवाद सत्रामध्ये प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी क्रीडा संस्कार, शिस्त व जीवनमूल्ये यांवर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडामूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा सहाय्यक श्री. सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. एल. एम. गळदगे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ॲड. गोरखनाथ बलकवडे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते), विशेष पाहुण्या श्रीमती नीलम शिरसाठ, श्री. योगेश शिरसाठ, कु. नारायणी जोशी, कु. समीक्षा पवार, प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य श्री. डी. एम. राठोड यांसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
