
विंचूर दि.२८(प्रतिनिधी,संदीप शिरसाट ) प्रत्येक जीव या भूतलावर राम कार्य करण्यासाठी आलेला आहे.आणि प्रत्येक जीवाचे मोक्ष हेच उद्दिष्ट आहे.त्यासाठी दयाळू भगवंताशी हनुमंता प्रमाणे मैत्री करा, भगवंताशी मैत्री म्हणजे भक्ती, भक्तीने वासना संपतात,आणि वासना विरहित जीवाचे शिवाशी मिलन होऊन मोक्ष मिळतो.संत्संग करा, संत संगती करा,संत जिवाला ईश्वराकडे घेऊन जातात. निसर्गात पाना फुलांत झाडांमध्ये देव आहे. निसर्गावर प्रेम करा,आई वडिल ईश्वराचे प्रतिक आहे.त्यांची सेवा करा, स्वतः मधील वासना संपवून स्वतः बरोबरच पुढील पिढीचे उत्तम चारित्र्य घडवा, जेथे कुठे समाज कार्य चालू असेल तेथे आपल्या परीने योगदान द्या, वासना विरहित होऊन आतून बाहेरून स्वच्छ रहा. सर्व धर्म ग्रंथ हेच शिकवतात. म्हणून सर्व धर्म ग्रंथ हेच जीवन आहे. असे प्रतिपादन विद्यावाचस्पती ह.भ.प.विवेक घळसासी यांनी केले.घळसासी हे येथील निसर्ग मंगल कार्यालयात कै. विमल वासुदेव दुसाने यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित सात दिवसीय रामकथेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते.पुढे बोलताना घळसासी यांनी बालपणीच ज्याला भक्तीची गोडी लागली त्याला तरुण पणी भक्तीची ओढ लागते.व त्याचे म्हातारपण सुखा समाधानात जाते.ज्याप्रमाणे आपण शेतीवाडी, घरदार यांचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करतो त्याप्रमाणे भक्तीचा वारसाही पुढील पिढीकडे सुपूर्द करावा, रघुवंशा प्रमाणे आपल्या प्रत्येक कार्यातून, कृतीतून समाज हित साधले गेले तर आपल्याही कुळात निश्चितच राम जन्मला येईल.असे मार्गदर्शन केले.यावेळी वारकरी सांप्रदाय व विंचूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
